क्रिकेट बॉल । प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात पाऊस अडथळा बनला आहे. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार सहावा दिवस, राखीव दिवस (Reserve Day) म्हणून वापरला जाईल. गेल्या अनेक दशकांपासून सहसा पाच दिवसांचा कसोटी सामना खेळला जातो परंतु दोन विश्वयुद्ध दरम्यान कसोटी क्रिकेट अमर्यादित वेळेत खेळले जायचे आणि एकदा तर तर 12 दिवस कसोटी सामना खेळला गेला होता. मार्च 1939 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) यांच्यात डर्बन येथे हा सामना रंगला होता. तो अखेरचा 'टाईमलेस टेस्ट' (Timeless Test) होता. सुरुवातीच्या काळात सामने वेळेच्या मर्यादा विना खेळले जायचे. (Cricket Coincident: क्रिकेट इतिहासातील असे 5 विचित्र योगायोग ज्यांच्यावर विश्वास बसणे आहे अशक्य)

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात खेळल्या गेलेल्या या सामन्याला सर्वात मोठ्या कसोटी सामन्याचा दर्जा मिळाला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद करण्यात आली आहे. 1939 मध्ये इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. डरबन येथे आफ्रिकी संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यजमान संघाने सामन्याच्या पहिल्या डावात 202.6 षटकांत 530 धावा केल्या. प्रत्युत्तरात ब्रिटिश संघाचा पहिला डाव 117.6 षटकांत फलंदाजीनंतर 316 धावांवर गुंडाळला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला आला आणि 142.1 षटकांत 481 धावा केल्या व इंग्लंडपुढे विजयासाठी 696 धावांचे लक्ष्य ठेवले. विशाल धावसंख्येच्या लक्ष्याचे पाठलाग करणाऱ्या इंग्लंड फलंदाजांनी आक्रमक पवित्रा वापरला. सलामीवीर लिओनार्ड हटन 55 धावा, पॉल गिब यांनी 120 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावरील बिल एडरिच यांनी 219 धावांची झुंजार खेळी केली. तसेच चौथ्या क्रमांकावरील वॉलि हेमंड यांनी 140 धावांचे योगदान दिले. एडी पेंटरने 75 धावा, लेस एमेसने नाबाद 17 धावा आणि ब्रायन वेलेंटाइनने नाबाद 4 धावा केल्या. यासह ब्रिटिश संघाने 218.2 ओव्हरमध्ये 5 बाद 654 धावांचा पल्ला गाठला.

विशेष म्हणजे सामना दुसऱ्या डावापर्यंत पोहोचायला तब्बल 12 दिवस लागले होते. यामध्ये विश्रांतीच्या 2 दिवसांचाही समावेश होता. सामन्याच्या 12 व्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 42 धावांची गरज होती. परंतु हा सामना संपण्याचे नाव घेत नव्हता. दुसरीकडे इंग्लंड संघाला त्याचदिवशी 2 दिवसांची रेल्वे यात्रा करून केपटाउनला पोहोचायचे होते त्यामुळे 654 धावांवर अनिर्णित घोषित करण्यात आला.