IND vs ENG Test: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी सामन्यात प्रेक्षकांचे गैरवर्तन, चालू सामन्यात सिराजच्या दिशेने भिरकावला चेंडू
मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा सामना हेडिंगले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Bowler Mohammad Siraj) स्थानिक प्रेक्षकांनी वाईट वागणूक दिली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) या संपूर्ण घटनेमुळे खूप रागावला होता. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Batsman Rishabh Pant) याने हा खुलासा केला आहे. ऋषभ पंत म्हणाला की, इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी चेंडू वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर फेकला होता. टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दाखवण्यात आले होते की, भारतीय कर्णधार विराट कोहली त्या वेळी सीमारेषेवर उभ्या असलेल्या सिराजला वस्तू बाहेर फेकण्यास सांगत होता. दिवसाचा खेळ संपल्यानंतर पंतला याबाबत विचारले असता त्याने संपूर्ण प्रकरण सांगितले.

पंत म्हणाला कोहली चिडला होता कारण प्रेक्षकांपैकी कोणीतरी सिराजवर चेंडू मारला होता. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही सांगू शकता. परंतु क्षेत्ररक्षकांवर गोष्टी फेकू नका. मला वाटते की हे क्रिकेटसाठी चांगले नाही. लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत भारताच्या विजयात सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली. या वर्षाच्या सुरुवातीला सिडनीमध्ये 27 वर्षीय वेगवान गोलंदाजाला ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी शिवीगाळ केली होती.ज्यामुळे काही प्रेक्षक स्टेडियमबाहेर फेकले गेले होते.

इंग्लंडचे प्रेक्षक त्यांच्या संघाला मजबूत स्थितीत पाहून उत्साहित झाले आणि त्यांनी सिराजला 'स्कोअर काय आहे' असे विचारले. मग काय होतं, सिराजलाही उत्तर द्यायला वेळ लागला नाही. त्याने आपल्या हातांनी प्रेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले की सध्या मालिकेचा स्कोअर 1-0 आहे आणि भारत यामध्ये इंग्लंडच्या पुढे आहे.  सिराजच्या या चोख प्रत्युत्तराने समालोचकही हसले आणि म्हणाले की, होय, या क्षणी भारत हा मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. हेही वाचा IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘हा’ मॅच-विनर ठरतोय टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी, लीड्सच्या हेडिंग्लेवर इतिहास रचण्यासाठी तयार

लॉर्ड्स कसोटी दरम्यानही शॅम्पेनच्या बाटल्यांच्या टोप्या सीमारेषेजवळ फेकल्या गेल्या. त्या वेळी केएल राहुल तिथे फिल्डिंग करत होता. कोहलीही त्या घटनेमुळे चिडला होता. या मालिकेदरम्यान भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्येही प्रचंड तणाव दिसून येत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारत आणि इंग्लंडचे खेळाडू एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडू देत नव्हते.