भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

युएई आणि ओमान येथे 17 ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत आपली मोहीम सुरु करण्यापूर्वी टीम इंडिया (Team India) सराव सामन्यांमध्ये दोन मजबूत संघांचा सामना करेल. ‘विराटसेना’ पहिल्या सामन्यात इंग्लंडशी (England) भिडेल, तर दुसऱ्या सराव सामन्यात त्यांचा सामना आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया (Australia) संघाशी होईल. भारताला स्पर्धेत पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध खेळायचा आहे. टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तानसह (IND vs PAK) ब गटात ठेवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध लढत 18 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे, तर कांगारूंविरुद्ध सामना 20 ऑक्टोबर 2021 रोजी खेळला जाईल. सूत्रांनीही याची पुष्टी केली. “भारत सराव सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना करेल आणि ते स्टारवर प्रसारित केले जातील,” एका सूत्राने सांगितले. (ICC T20 World Cup 2021 All Team Squad: भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांचे संघ घोषित; जाणून घ्या संपूर्ण पथक)

कोहलीच्या संघाला पुढील स्पर्धेत दोन मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचा लाभ मिळेल. भारतीय क्रिकेट संघाने 2007 मध्ये आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत विजेतेपदाचा मान मिळवला होता. तत्कालीन एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील इतिहास रचला आणि स्पर्धेच्या शिखर लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. 2014 मध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक जिंकण्याच्या जवळ पोहचला होता जेव्हा त्यांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.पण नंतर, ‘मेन इन ब्लू’ला उत्साही श्रीलंकेच्या संघाने 6 विकेटने पराभूत केले. भारतात 2016 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या मागील आवृत्तीत, उपांत्य फेरीच्या वेळी वेस्ट इंडिजच्या संघाने टीम इंडियाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला होता.

पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय संघ 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी आणि 3 नोव्हेंबरला संघ अफगाणिस्तानशी भिडेल. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर यासारख्या युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर निवडकर्त्यांनी शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि युजवेंद्र चहल यासारख्या मोठ्या नावांचा वर्ल्ड कप संघातून वगळले आहेत. भारताच्या वर्ल्ड कप संघातील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे आर अश्विन, ज्याला चार वर्षानंतर टी -20 संघात स्थान देण्यात आले. इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत आपला दम दाखवणाऱ्या ईशान किशनलाही संघात स्थान देण्यात आले आहे. निवडकर्त्यांनी जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या अनुभवी जोडीवर वेगवान गोलंदाज म्हणून विश्वास दाखवला आहे.