केबी अरुण कार्तिक आणि कर्णधार दिनेश कार्तिक (Photo Credit: Twitter)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: राजस्थान (Rajasthan) संघावर 7 विकेटने मात करत दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) तामिळनाडू (Tamil Nadu) संघाने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy Final) सलग दुसऱ्यांदा मजल मारली. अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तामिळनाडूच्या राजस्थानने दिलेल्या 155 धावांचे लक्ष्य केबी अरुण कार्तिकच्या नाबाद 89 धावांच्या जोरावर 18.4 ओव्हरमध्ये सहज गाठले. कार्तिकने कर्णधार दिनेश कार्तिकसह 89 धावांची भागीदारी केली आणि राजस्थानच्या गचाळ फिल्डींगमुळे विजयीरेष ओलांडली. अरुण कार्तिकने (Arun Karthik) 3 षटकार आणि 9 चौकार ठोकले आणि तमिळनाडूला धावांचा पाठलाग करताना मागे पडू दिले नाही. केबी अरुणने चौकार खेचत संघाला सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचवले. सामन्यात राजस्थान संघाचा कर्णधार अशोक मेनारियाने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 154 धावा केल्या. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: Vishnu Solanki याने शेवटच्या चेंडूवर मारला हेलिकॉप्टर शॉट, हरियाणाचा दारुण पराभव करत बरोदाची सेमीफायनलमध्ये धडक)

लक्षात घेण्यासारखे म्हणजे यंदाच्या हंगामात एकही सामना न गमावता तामिळनाडू संघाने अंतिम फेरी गाठली आहे. एलिट ग्रुप बीमध्ये संघाने सर्व पाच सामने जिंकले होते. शिवाय, दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात संघाने तीन वेळा (2007, 2019 आणि 2021) अंतिम फेरी गाठली आहे. राजस्थानसाठी आदित्य गढवालने 29 धावा केल्या, तर कर्णधार अशोक मेनारियाने 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, साई किशोरच्या चेंडूवर मेनारिया 51 धावांवर झेलबाद झाला. अर्जित गुप्ताने 45 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात तामिळनाडू संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीलाच दोन झटके बसले. सी हरि निशांत 4 आणि एन जगदीसन 28 धावा करून माघारी परतले. बाबा अपराजित अपयशी ठरला आणि 2 धावाच करू शकला. त्यानंतर केबी अरुणने कर्णधार कार्तिकसह संघाचा डाव सावरला आणि विजयीरेष ओलांडून दिली. अरुण कार्तिकने नाबाद 89 धावा आणि कर्णधार कार्तिक नाबाद 26 धावा करून परतले.

दुसरीकडे, याच मैदानावर आता बरोदा आणि पंजाब संघात दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाईल. दोन्ही संघातील विजयी संघ तामिळनाडू संघाबरोबर 31 जानेवारी रोजी होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात टक्कर देईल.