करिश्माई यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) 'हेलिकॉप्टर शॉट' हा प्रत्येक चाहत्यांचा आवडता आहे पण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) हेलिकॉप्टर शॉट पाहून भारतीय संघाचा हा माजी कर्णधारही एकावेळी चकित झाला होता. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतच्या अकाली निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांत अशाप्रकारे अचानक आपल्यातून निघून जाईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. सुशांत उत्तम अभिनेता तर होताच पण एखादी भूमिका जिवंत करण्यासाठी तो प्रचंड मेहनत घ्यायचा. त्या व्यक्तीचा खोलवर अध्यास करून त्यानंतर पडद्यावर तो ती व्यक्तीरेखा साकारायचा. सुशांतने अनेक चित्रपट केले पण आजही आणि कदाचित कायमचा तो ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ (MS Dhoni: The Untold Story) मधल्या धोनीच्या रोलसाठी आठवला जाईल. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला की सुशांतची हेलिकॉप्टर शॉट्स खेळण्याची पद्धत त्याच्यासारखीच आहे. (Sushant Singh Rajput Funeral: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यावर आज मुंबई मध्ये होणार अंत्यसंस्कार)
धोनी म्हणाला, "सुशांतचा हेलिकॉप्टर शॉट माझ्यासारखाच आहे, शूटिंगचा सराव करताना तो हा शॉट माझ्यापेक्षा कित्येक वेळा चांगला खेळायचा." या चित्रपटात सुशांतने धोनीचे पात्र चमकदार पद्धतीने साकारले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडाही गाडला. दरम्यान, धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतला धोनीने नव्हे तर भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे (Kiram More) प्रशिक्षण दिले होते. सुशांतने किरण मोरेंसोबत अनेक महिने खडतर सराव केला होता. मोरेंसोबत सुशांतने तब्बल 13 महिने सराव केला मात्र एका अभिनेत्यासारखा नाही एका व्यावसायिक क्रिकेटपटूसारखा. सुशांतने प्रचंड मेहनत घेऊन पडद्यावर हुबेहूब तसा धोनी साकारला. त्यामुळे सुशांतला त्या रोलसाठी कायम लक्षात ठेवले जाईल.
दरम्यान, सुशांतच्या निधनाबद्दल मोरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याने ट्विट केले की, "वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हा धक्कादायक क्षण आहे, धोनीच्या भूमिकेसाठी मी त्यांना प्रशिक्षण दिले. मला माहित नाही की त्यांच्या ओळखीचे लोकं या धक्क्यायेणे कसे स्वतःला सावरतील. मित्रा, तू लवकरच निघून गेलास."