
हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिंमतीवर स्थान मिळवलेल्या एका हरहुन्नरी कलाकारांपैकी सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) एक आहे. काल (14 जून) मुंबई मध्ये वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी सुशांतने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतसिंग राजपूतने जीवन संपावण्याच्या घेतलेला हा टोकाचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार तो नैराश्यामध्ये होता आणि त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र काल दुपारी अचानक त्याने आत्महत्या केल्याचं समोर आल्यानं त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात आहे. आज सुशांतसिंग राजपूत याच्यावर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार होतील. Sushant Singh Rajput Passed Away: सुशांत सिंह राजपूत याच्या खाजगी आयुष्याविषयी '10' खास गोष्टी.
सुशांतसिंह हा मूळचा बिहार येथील पाटण्याचा होता. त्याचे वडील, चुलत भावंडं तेथेच राहत होते. त्यांना सुशांतच्या निधनाच्या बातमीचा धक्का बसला आहे. दरम्यान काल रात्री सुशांतचे वडिल आणि इतर कुटुंबिय मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम झाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल येईल आणि मृतदेह कुटुंबांच्या ताब्यात दिला जाईल. Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना.
सुशांतसिंग राजपूत याचे कुटुंबिय मुंबई मध्ये दाखल


सुशांतसिंग राजपूत याची ओळख 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेपासून झाली. त्यानंतर तो ' काय पो छे', 'पीके', 'महेंद्रसिंग धोनी - अनटोल्ड स्टोरी' अशा दर्जेदार सिनेमांमध्ये झळकला होता. छिछोरे या त्याच्या शेवटच्या सिनेमामध्ये त्याने आत्महत्याग्रस्त मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर ' दिल बेचारा' या सिनेमामध्ये सुशांत शेवटचा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.
सुशांतसिंग राजपूत सारख्या कलाकाराच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, करिना कपूर, करण जोहर यांच्यापासुन अगदी किरण मोरे, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनी सुशांतला श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्त केली आहे.