बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड विश्वासह त्याच्या असंख्य चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी घोडदौड करत असलेला आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सुशांतने आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सुशांत आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी वा-यासारखी पसरताच अनेकांना धक्काच बसला. वयाच्या 34 व्या अशा तरूण आणि हरहुन्नरी अभिनेत्याने आपल्यातून जाणे हे अनेकांना चटका लावणारे आहे.
सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून त्याच्या मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. सुशांतच्या आत्महत्येची बातमी त्याच्या नोकराने पोलिसांना दिली. Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना
हुशार आणि हरहुन्नरी अशा सुशांत सिंह याच्या खाजगी आयुष्याविषयी '10' खास गोष्टी
1. सुशांत सिंह राजपूत याचा जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये पटना येथे झाला होता. त्याला चार बहिणी आहेत. त्याचे वडील एक शासकीय कर्मचारी होते.
2. शाळेनंतर त्याने दिल्लीच्या इंजिनियरिंग कॉलेजहून मेकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास केला होता.
3. मात्र सुशांतला अभिनय आणि नृत्याची आवड असल्यामुळे तो सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक डावरच्या ग्रुपमध्ये सामील झाला. त्याने 51 व्या फिल्मफेयर समारंभात बॅक डांसर म्हणून भाग घेतला होता.
4. मुंबई आल्यावर सुशांतने नादिरा बब्बरचे थिएटर ग्रुप जॉईन केला होता. बॅरी जॉन अॅकडमीहून अभिनयाचे धडेही घेतले.
5. 2008 मध्ये 'बालाजी टेलीफिल्म्सच्या 'किस देश में है मेरा दिल' यात 'प्रीत जुनेजा' ची भूमिका मिळाली.
6. 2009 मध्ये सुशांतने 'पवित्र रिश्ता' मध्ये मानवची भूमिका निभावून घराघरात आपली ओळख निर्माण केली. या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते आणि घराघरात सुशांत मानव या नावानेच ओळखू लागला.
7. सुशांतने झलक दिखला जा या रिअॅलिटी शो च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला होता.
8. सुशांतने 'काई पो छे' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके, डिटेक्टिव ब्योमकेस बक्शी, एम.एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी, राबता, केदारनाथ यांसारखे बरेच हिट चित्रपट दिले.
9. सुशांतचे 'पवित्र रिश्ता' मध्ये आपल्या सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सह रिलेशनशिप बरेच चर्चेत होते. शो संपल्यावर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही वेगळे झाले.
10. अलीकडे सुशांतच नाव अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत घेतलं जात होतं. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल असायचे.
दरम्यान, मागील काहीच महिन्यात बॉलीवूडला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी अभिनेता इरफान खान, त्यांनतर दुसर्याच दिवशी अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. या दोघांनाही कँसर होता. मात्र सुशांतने स्वतः आपल्या मृत्यूचा निर्णय घेऊन आपल्या फॅन्सना मोठा धक्का दिला आहे.