दक्षिण आफ्रिका टीमसाठी मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया आणि भारतविरुद्ध वनडे मालिकेतून कगिसो रबाडा आऊट
कगिसो रबाडा (Photo Credit: Getty Images)

शनिवारीपासून ऑस्ट्रेलिया (Australi) विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेआधी यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर मुकावे लागत आहे. त्याचा ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारत (India) विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी आफ्रिकी संघात समावेश केला जाणार नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान रबाडाला दुखापत झाली होती. या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 11 ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत 114 धावा लुटवल्या. तो एक महिना म्हणजेच चार आठवड्यांपर्यंत क्रिकेटपासून दूर राहील. कंबरेच्या दुखापतीमुळे त्याला एक महिन्याची विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, तो 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलच्या 13 व्या सत्रापूर्वी बरा होऊन खेळपट्टीवर परत येईल. (SA vs AUS 2nd T20I: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध स्टिव्ह स्मिथ बनला 'सुपरमॅन', हवेत उडी मारून टीमसाठी रोखल्या सहा धावा Video)

शनिवारी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय वनडे मालिकेचा पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेचा शेवटचा सामना 7 मार्च रोजी खेळला जाईल. यानंतर दक्षिण आफ्रिका संघ भारत दौर्‍यावर येईल. भारत दौर्‍यावर आफ्रिकी संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मालिकेचा पहिला सामना 12 मार्च रोजी धर्मशाळा तर तिसरा आणि शेवटचा सामना कोलकातामध्ये 18 मार्च रोजी खेळला जाईल. दोन्ही मालिकांसाठी रबडाच्या जागी दुसऱ्या खेळाडूची अजून निवड झालेली नाही.

कसोटी आणि वनडेमध्ये जगातील पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये स्थान मिळवलेल्या रबाडाला मार्चअखेरपासून सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगसाठी पूर्णपणे फिट होण्याच्या होण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. यापूर्वी आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली ज्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला आणि मालिका 2-1 ने जिंकली.