डीन एल्गार आणि टेंबा बावुमा (Photo Credit: Twitter/ICC)

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) क्रिकेटमधील उलथापालथ थांबलेली दिसत नाही. पाकिस्तानमध्ये (Pakistan) कसोटी आणि टी-20 मालिकेच्या पराभवाचा फटका संघाचा कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला बसला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर संघाच्या दारुण पराभवानंतर दक्षिण आफ्रिका बोर्डाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (CSA) गुरुवारी डी कॉकची कर्णधारपदावरून हकालपट्टी करत नवीन कर्णधारांची नावे जाहीर केली. पाकिस्तान दौर्‍यावर तीनही फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व डी कॉक करत होता. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने गुरुवारी मोठे पाऊल उचलत त्यांचा नवीन कसोटी कर्णधार म्हणून डीन एल्गार (Dean Elgar) तर मर्यादित ओव्हर संघाच्या कर्णधापदी टेंबा बावुमाची (Temba Bavuma) नियुक्ती करण्याची घोषणा केली. गेल्या एक वर्षापासून डी कॉक याच्याकडे तात्पुरते कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डी कॉकच्या नेतृत्वात संघाने संमिश्र कामगिरी केली.

नुकतीच पाकिस्तानमध्ये त्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली तर त्यापूर्वी डिसेंबर-जानेवारी महिन्यात घरी खेळत श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने विजय  मिळवला. गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक ग्रीम स्मिथ म्हणाले की, “मर्यादित ओव्हरच्या स्वरुपात संघाच्या कर्णधारपदासाठी केलेल्या कामगिरीबद्दल आम्ही क्विंटनचे आभारी आहोत आणि राष्ट्रीय निवड समितीने कसोटी कर्णधारपदाचा शोध सुरु ठेवला असताना पुढे येण्यासाठी ऋणी आहोत. तरीही त्याने संघाच्या नेतृत्व गटामध्ये अविभाज्य भूमिका बजावावी अशी आमची अपेक्षा आहे. सीएसए म्हणून आम्ही टेंबा आणि डीन यांच्या नियुक्तीवर खूष आहोत आणि असा विश्वास आहे की आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे संघाला त्यांच्या जुन्या विजयी स्थितीत परत आणतील. ही जोडी दोन्ही नेतृत्वात आवश्यक स्थिरता आणतात आणि संघाला विजयाच्या दिशेने नेतील के ट्रॉफी कॅबिनेटमध्ये परत आणेल.”

दरम्यान, बावुमाने दक्षिण आफ्रिकेकडून 44 कसोटी, सहा वनडे आणि आठ टी-20 सामने खेळले आहेत तर सलामी फलंदाज एल्गारने 67 कसोटी आणि आठ वनडे सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिका संघ तीन वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे.