
Smriti Mandhana New Record: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिची बॅट जोरदार तळपली. मानधनाने या सामन्यात धमाकेदार शतक ठोकून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. तिने अवघ्या ७७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे भारतीय महिला फलंदाजाचे दुसरे सर्वात जलद एकदिवसीय शतक ठरले आहे. आपल्या ९१ चेंडूंच्या खेळीत मानधनाने १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. AFG vs SL Live Streaming: अफगाणिस्तानसाठी 'करो या मरो'चा सामना; विजयाने सुपर-4 मध्ये प्रवेश, अन्यथा बाहेर, कुठे पाहणार लाईव्ह सामना
स्मृती मानधनाने अनेक मोठे विक्रम मोडले
आपल्या या शानदार शतकासह मानधनाने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत:
- सर्वाधिक शतके: मानधनाने या वर्षी तिचे तिसरे वनडे शतक ठोकले. एका कॅलेंडर वर्षात तीन किंवा त्याहून अधिक वनडे शतके झळकावण्याची ही तिची दुसरी वेळ होती. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली आहे.
- आशियाई महिलांमध्ये अव्वल: १५ आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारी ती पहिली आशियाई महिला क्रिकेटपटू बनली आहे.
- चौथी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू: या शतकासह मानधनाने वेस्ट इंडिजची महान खेळाडू स्टेफनी टेलर (९,२९९ धावा) हिला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला क्रिकेटपटूंमध्ये चौथी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. तिच्या नावावर आता ९,३०७ धावा आहेत. तिच्या पुढे फक्त तीन दिग्गज फलंदाज आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू
- मिताली राज (भारत): १०,८६८ धावा
- सुझी बेट्स (न्यूझीलंड): १०,६१२ धावा
- शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड): १०,२७३ धावा
- स्मृती मानधना (भारत): ९,३०७ धावा
- स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज): ९,२९९ धावा
ऑस्ट्रेलियाचा ५२ वर्षांतील सर्वात मोठा पराभव
या सामन्यात मानधनाच्या शतकाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने ४९.५ षटकांत २९२ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघाला १९० धावांवरच रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारताने हा सामना १०२ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाचा हा एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठा पराभव होता, ज्यामुळे त्यांचा ५२ वर्षांचा एक लाजिरवाणा विक्रम मोडला. यापूर्वी १९७३ मध्ये, ऑस्ट्रेलियन महिला संघाला ९२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.