
Cricketer Died Heart Attack: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी ब्लॉकमध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यात आनंदाचा क्षण काही क्षणातच शोकात बदलला. सामन्यादरम्यान गोलंदाजाची शेवटची चेंडू टाकताच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मैदानावर एकच गोंधळ उडाला. उपस्थित लोकांनी गोलंदाजाला तात्काळ सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला आणि जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हे देखील वाचा: Smriti Mandhana New Record: स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी; विश्वविक्रम करून लिहिला नवा अध्याय)
मुरादाबाद आणि संभल यांच्यात सामना
ही दुर्दैवी घटना यूपी व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित सामन्यात घडली. या सामन्यात मुरादाबाद आणि संभल या संघांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. संभलच्या संघाला शेवटच्या चार चेंडूंवर 14 धावांची गरज होती आणि गोलंदाजीची जबाबदारी अहमर खानवर होती. डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अहमर खानने या षटकात केवळ 11 धावा दिल्या आणि मुरादाबादला विजय मिळवून दिला. पण काही क्षणांतच हा विजय मातमात बदलला.
गोलंदाज अहमर खानचा मृत्यू
अहमर खानने षटकातील शेवटचा चेंडू टाकताच त्याचा श्वास वेगाने वाढला आणि तो पिचवर खाली बसला. काही क्षणांनंतर तो जमिनीवर कोसळला. हे पाहून दोन्ही संघातील खेळाडू आणि प्रेक्षक घाबरले. त्याला पिचवरच सीपीआर देण्यात आला आणि थोडी हालचाल दिसल्याने त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
स्थानिक आमदारही होते उपस्थित
या घटनेच्या वेळी मैदानावर स्थानिक सपा आमदार हाजी मोहम्मद फहीम इरफान अतिथी म्हणून उपस्थित होते. अहमर खान मुरादाबादच्या एकता विहार परिसरात राहत होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबात शोककळा पसरली आहे. कुटुंबात पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार असून, या दु:खद घटनेने संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे.