
Smriti Mandhana: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 3 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त खेळ करत 330 धावांचे लक्ष्य उभे केले. मात्र, गोलंदाजांच्या निष्प्रभ कामगिरीमुळे टीम इंडियाला विजय गमवावा लागला. भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि प्रतीका रावल या सलामीवीरांनी अप्रतिम सुरुवात करून दिली. दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येची भक्कम पायाभरणी केली. मानधनाने 66 चेंडूंमध्ये 80 धावा ठोकल्या, ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सलग “फिफ्टी प्लस” स्कोर
स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग पाचव्यांदा अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. तिने मागील पाच डावांमध्ये या संघाविरुद्ध तब्बल 485 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 2 अर्धशतके आहेत. याआधी, 2017 ते 2024 दरम्यान तिने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग पाच “फिफ्टी प्लस” स्कोर केले होते. त्यामुळे ती महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. हे तिच्या नावावरचे एक ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड ठरले आहे.
A moment to cherish 🫡
Youngest and quickest to reach 5️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs in Women's ODIs ✅
Smriti Mandhana is putting on a show in Vizag.
Updates ▶ https://t.co/VP5FlL3pWw#TeamIndia | #WomenInBlue | #INDvAUS | #CWC25 | @mandhana_smriti pic.twitter.com/X6M48wYHZW
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
भारतीय संघासाठी 5000 पेक्षा अधिक धावा
स्मृती मानधनाचे नाव आज जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये घेतले जाते. तिने 2013 साली भारताकडून वनडे पदार्पण केले आणि काही वर्षांतच संघाच्या फलंदाजीचा कणा बनली. आतापर्यंत तिने भारतासाठी 112 वनडे सामन्यांमध्ये 5022 धावा केल्या असून, तिच्या नावावर 13 शतके आणि 33 अर्धशतके आहेत.
भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी करत 330 धावा केल्या. स्मृती मानधना (80) आणि प्रतीका रावल (75) यांनी अर्धशतके झळकावली, तर जेमिमा रोड्रिग्ज (33) आणि ऋचा घोष (32) यांनीही चांगले योगदान दिले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी या मजबूत धावसंख्येचे रक्षण करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅलिसा हिलीने केवळ 107 चेंडूंमध्ये 142 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यात 21 चौकार आणि 3 षटकार होते. तिच्याशिवाय एलिस पेरीने 47 आणि अॅश्ले गार्डनरने 45 धावा केल्या. त्यांच्या या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 6 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवत भारतावर मात केली.