इंग्लंड संघ (Photo Credit:AP/PTI)

पोर्ट एलिझाबेथ (Port Elizabeth) मध्ये 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टेस्ट सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) संघ आजपासून आमने-सामने येणार आहे. आजच्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिका संघाने पहिला, तर इंग्लंडने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यामुळे, हा सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, आजचा सामना इंग्लंडसाठी एका कारणामुळे खास आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड यांच्यात मार्च 1877 मध्ये मेलबर्नच्या स्टेडियममध्ये पहिला अधिकृत कसोटी सामना खेळला गेला होता आणि 143 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमधील कसोटी सामना इंग्लंडचा परदेशी भूमीवर 500 वा सामना आहे. आजवर खेळलेल्या सामन्यात इंग्लंडने 149 सामने जिंकले, तर 182 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आणि 168 सामने ड्रॉ राहिले.

इंग्लंडने या पराक्रमासह अव्वल स्थान मिळवले असून ऑस्ट्रेलियाने 404, वेस्ट इंडिजने 295, पाकिस्तान 274 आणि टीम इंडियाने 268 समाने खेळले आहेत. दरम्यान, इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेत हा 84 सामना आहे. इंग्लंडने आजवर आफ्रिकामधील 32 टेस्ट सामन्यात विजय मिळवून 20 सामनात त्यांचा पराभव झाला आहे, तर 31 सामने ड्रॉ राहिले. दुसरीकडे, आजच्या सामन्यात डेन पीटरसन याने ड्वेन प्रिटोरियस याच्या जागी यजमान संघाकडून पदार्पण केले आणि मार्क वूड याला जेम्स अँडरसनच्या जागी प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. जोफ्रा आर्चर यालाही वगळण्यात आले आहे.

तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी असा आहे दक्षिण आफ्रिका-इंग्लंड संघ

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गार, पीटर मालन, झुबैर हमजा, फाफ डु प्लेसिस, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, क्विंटन डी कॉक, वर्नोन फिलेंडर, केशव महाराज, डेन पीटरसन, कागिसो रबाडा.

इंग्लंड: झॅक क्रॉली, डोम सिब्ली, जो डेन्ली, जो रूट, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, सॅम कुर्रान, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वुड.