रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG Test Series 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) भारताचा (India) धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट तळपली आहे. संघातील अन्य ज्येष्ठ खेळाडूंपैकी या दौऱ्यात आतापर्यंत त्याने दोन डावांमध्ये दोन अर्धशतकांसह एकूण 230 धावा केल्या आहेत. या मालिकेतील चौथा सामना येत्या गुरुवारपासून म्हणजेच उद्या लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात जर भारतीय सलामीवीर रोहितची बॅट चालली, तर तो अनेक विक्रमांचा ढीग उभारू शकतो. रोहित शर्मा मॅचविनिंग खेळाडू आहे. त्याच्याकडे मोठा डाव खेळण्याची क्षमता आणि प्रतिभा दोन्ही गोष्टी आहेत. तसेच केएल राहुल सोबत त्याने इंग्लंड दौऱ्यावर संघाला गेल्या तीनही कसोटी सामन्यांमध्ये दमदार सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मावर सर्वांची नजर असेल. (Rohit Sharma इंग्लंडमध्ये ‘या’ कारणामुळे ठरतोय ‘हिट’, विराट कोहलीने घ्यायला पाहिजे धडा; माजी भारतीय क्रिकेटपटूने केला खुलासा)

3000 कसोटी धावा पूर्ण करण्यापासून 91 धावा दूर:

रोहितने आतापर्यंत 42 कसोटी क्रिकेट सामने खेळताना 72 डावांमध्ये 46.2 च्या सरासरीने 2909 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत जर तो ओव्हल कसोटीत 91 धावा काढण्यात अधिक यशस्वी झाला तर तो कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांचा आकडा गाठेल. 'हिटमॅन' रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सात शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. यामध्ये त्याची वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी कामगिरी 212 धावा आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा करण्यापासून 22 धावा दूर:

रोहितने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 14978 धावा केल्या आहेत. म्हणून ओव्हल कसोटीत 22 धावा करताच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा जमा होतील. त्याने 42 कसोटी सामन्यांमध्ये 46.2 च्या सरासरीने 2909 धावा, 227 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49.0 च्या सरासरीने 9205 धावा आणि 111 टी -20 सामन्यांमध्ये 32.5 च्या सरासरीने 2864 धावा केल्या आहेत.

सलामीवीर म्हणून 1500 धावा करण्यापासून 176 धावा दूर:

सलामीवीर म्हणून 15 कसोटी क्रिकेट सामने खेळत रोहितने 57.56 च्या सरासरीने 1,324 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत जर त्याने ओव्हल कसोटीत 176 धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येत 1500 धावांचा आकडा गाठेल.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा:

यंदाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत इंग्लिश कर्णधार जो रूटने तीन सामन्यांच्या पाच डावांमध्ये 126.75 च्या सरासरीने 507 धावा केल्या आहेत. यानंतर, केएल राहुलने तीन सामन्यांच्या सहा डावांमध्ये 42.00 च्या सरासरीने 252 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर रोहितने तीन सामने खेळताना तीन डावांमध्ये 46.00 च्या सरासरीने 230 धावा केल्या आहेत. जर शर्मा ओव्हल कसोटीत त्याच्या रंगतदार ल्यूट दिसला, तर तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुलला मागे टाकू शकतो.

2021 मध्ये कसोटी धावांची हजारी:

रोहितने यंदाच्या वर्षात 10 कसोटी सामन्यांच्या 19 डावात 768 धावा केल्या आहेत. भारताकडून यंदाच्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक टेस्ट रन करणारा तो आघाडीचा फलंदाज आहे. अशास्थितीत यंदाच्या वर्षात तो कसोटी क्रिकेटमध्ये धावांची हजारी धावसंख्या गाठण्यापासून 51 धावा दूर आहे. आतापर्यंत इंग्लंड कर्णधार जो रूटने 11 कसोटी सामन्याच्या 21 डावात सर्वाधिक 1398 धावांचा डोंगर उभारला आहे.