Rohit Sharma Announces Retirement From Test Cricket

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अव्वल फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) तात्काळ निवृत्ती जाहीर केली आहे. ही घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि निवड समितीशी चर्चा केल्यानंतर झाली असून, रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. 38 वर्षीय रोहितने 2024-25 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत (BGT) निराशाजनक कामगिरी केल्यानंतर हा निर्णय घेतला, जिथे त्याने पाच डावांत केवळ 31 धावा केल्या.

याशिवाय, भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरी 0-3 असा पराभव स्वीकारला आणि ऑस्ट्रेलियातही मालिका गमावली, ज्यामुळे रोहितच्या फलंदाजी आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघात नव्या पिढीच्या खेळाडूंना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्तीनंतर रोहित आता एकदिवसीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) वर लक्ष केंद्रित करेल.

रोहित शर्मा कसोटी कारकीर्द-

रोहित शर्माने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्याला कसोटी पदार्पण केले होते. त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने 12 शतके आणि 18 अर्धशतकांसह 4301 धावा केल्या. त्याचे सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर 212 धावा होते, जे त्याने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे केले. रोहितची विशेषतः सलामीवीर म्हणून आपली छाप पाडली, जिथे त्याने 2019 नंतर 2,000 हून अधिक धावा केल्या. कर्णधार म्हणून त्याने 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यामध्ये 10 विजय, 8 पराभव आणि 4 सामने अनिर्णित राहिले.

रोहितने 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याने जून 2024 मध्ये भारताला टी-20 विश्वचषक जिंकून दिला, आणि 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. मात्र, कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी गेल्या काही वर्षांत खालावली.

निवृत्तीचा निर्णय- 

ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटी सामन्यात त्यांनी स्वतःला वगळले होते, ज्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना बळ मिळाले. त्याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते की, ‘हा निवृत्तीचा निर्णय नाही, मी फक्त त्या सामन्यासाठी विश्रांती घेत आहे.’ मात्र, मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर त्याने निवृत्तीचा विचार केला होता, परंतु काही जवळच्या व्यक्तींनी त्याला पुनर्विचार करण्यास सांगितले. आता अखेर त्याने कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेतली. (हेही वाचा: IPL 2025 MI vs GT: हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरावर BCCI ची कारवाई; आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला दंड)

दरम्यान, रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला नवीन कसोटी कर्णधार मिळणार हे स्पष्ट झाले आहे. या शर्यतीत जसप्रीत बुमराह, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत आघाडीवर आहेत. ही मालिका जूनमध्ये सुरू होईल. जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचे कर्णधारपद मिळण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, रोहित शर्माने भारतीय क्रिकेटला अनेक अविस्मरणीय क्षण दिले. त्याच्या आक्रमक फलंदाजीने आणि नेतृत्वाने भारताला अनेक यश मिळवून दिले. विशेषतः, त्याने सलामीवीर म्हणून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जागतिक विक्रम केले.