RCB (Photo Credit- X)

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या आयपीएल 2025 विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगळीमुळे, 11 जणांचा मृत्यू झाला आणि 56 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर आता याबाबत सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल (CAT) ने 1 जुलै 2025 रोजी आपला निर्णय जाहीर केला, ज्यामध्ये आरसीबीला या गोंधळासाठी प्रथमदर्शनी जबाबदार ठरवले गेले. ट्रिब्यूनलने म्हटले की, आरसीबीने पोलिसांची परवानगी न घेता सोशल मीडियावर विजयी मिरवणुकीची घोषणा केली, ज्यामुळे 3 ते 5 लाख लोकांचा जमाव जमला. यामुळे पोलिसांना इतक्या कमी वेळेत (12 तास) व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. पोलीस हे ‘अल्लादिन का चिराग’ सारखे जादुई शक्ती असलेले नसल्याचे ट्रिब्यूनलने नमूद केले.

3 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे आरसीबीने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावले, ज्यामुळे बेंगळुरूत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी 4 जून रोजी विधान सौधापासून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत मिरवणूक आणि स्टेडियममध्ये चाहत्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आरसीबी 4 जून रोजी सोशल मीडियावर मिरवणुकीची घोषणा केली, ज्यामुळे 2.5 ते 5 लाख चाहते स्टेडियमबाहेर जमले. स्टेडियमची क्षमता केवळ 35,000 असताना, इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या जमावामुळे गोंधळ निर्माण झाला.

चाहत्यांनी प्रवेशद्वारांवर धक्काबुक्की केली, भिंती आणि गेट्सवर चढण्याचा प्रयत्न केला, आणि काहींनी बेकायदा प्रवेशाचा प्रयत्न केला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 तरुणांचा मृत्यू झाला. आता 1 जुलै 2025 रोजी सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलच्या बेंगळुरू खंडपीठाने, ज्यामध्ये न्यायमूर्ती बी. के. श्रीवास्तव आणि प्रशासकीय सदस्य संतोष मेहरा यांचा समावेश होता, या प्रकरणात आपला निर्णय जाहीर केला. ट्रिब्यूनलने आरसीबीला या चेंगळीसाठी प्रथमदर्शनी जबाबदार ठरवले, कारण त्यांनी पोलिसांची परवानगी किंवा सहमती न घेता सोशल मीडियावर मिरवणूक आणि कार्यक्रमाची घोषणा केली.

ट्रिब्यूनलने नमूद केले की, आरसीबीने कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर पोलिसांना कमी वेळेत इतक्या मोठ्या जमावाच्या व्यवस्थेसाठी तयारी करणे अशक्य होते. ट्रिब्यूनलने पोलिसांचा बचाव करताना म्हटले, ‘पोलीस कर्मचारीही माणसे आहेत, ते ना देव आहेत ना जादूगार, आणि त्यांच्याकडे अल्लादिन चिरागासारख्या जादुई शक्ती नाहीत, जे एका बोटाने सर्व इच्छा पूर्ण करू शकतील. या प्रकरणात, कर्नाटक सरकारने बेंगळुरू पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. सरकारने पोलिसांवर ‘गंभीर गैरवर्तन’ चा आरोप केला होता, परंतु ट्रिब्यूनलने हे निलंबन ‘यांत्रिक’ आणि ‘पुराव्याशिवाय’ असल्याचे म्हटले. (हेही वाचा: Air Pollution संपवण्यासाठी Rishabh Pant चा जागतीक स्तरावर पुढाकार; 'निरोगी आणि स्वच्छ परिसर' साठी सामूहिक कृतीचे केले आवाहन)

या दुर्घटनेनंतर, बेंगळुरू पोलिसांनी आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसले आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी सुनिल मॅथ्यू, किरण, आणि सुमंत यांना 5 जून 2025 रोजी अटक केली. कर्नाटक उच्च न्यायालयाने 12 जून 2025 रोजी या चौघांना अंतरिम जामीन मंजूर केला, परंतु त्यांना त्यांचे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. याशिवाय, कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) कडे सोपवली, ज्याचे नेतृत्व अतिरिक्त महासंचालक बी. के. सिंग करत आहेत. एसआयटीने ने तीन स्वतंत्र एफआयआर दाखल केल्या आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत एक जनहित याचिका दाखल केली आहे, आणि सरकारला या दुर्घटनेतील त्रुटींबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.