PSL 2021: आऊच! पाकिस्तान सुपर लीगमध्ये सरावादरम्यान खेळाडूच्या तोंडावर आदळला चेंडू, ओठांवर घातले 7 टाके (See Photo)
बेन डंक (Photo Credit: Twitter)

युएईमध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) सहाव्या आवृत्तीच्या उर्वरित सामन्यांच्या सुरुवातीपूर्वी अबू धाबी (Abu Dhabi) येथे झालेल्या सराव सत्रात लाहोर कलंदरचा  (Lahore Qalandars) यष्टिरक्षक फलंदाज बेन डंक (Ben Dunk) गंभीर जखमी झाला आहे. तडाखेबाज फलंदाज कलंदर संघाच्या महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक आहे आणि पीएसएलला (PSL) काही दिवस शिल्लक असताना फ्रँचायझीसाठी धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅच पकडताना 34 वर्षीय फलंदाजनच्या ओठांवर जोरदार चेंडू आदळलं आणि त्याला सात टाके पडले. इतकंच नाही तर डंकच्या ओठांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. 9 जूनपासून पीएसएलचे उर्वरित सामने खेळले जाणार आहेत. अशापरिस्थितीत लाहोर संघासाठी हा एक मोठा धक्का ठरत आहे. चार सामन्यांमधून तीन सामने जिंकून कलंदर संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहेत. (‘टी-20 क्रिकेट लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोका’, दक्षिण आफ्रिका आणि CSK च्या तडाखेबाज फलंदाजाचे मोठे विधान)

यापूर्वी संघाकडून चार सामन्यादरम्यान डंकने चांगली कामगिरी केली होती. डंकने कराची किंग्ज विरोधात नाबाद 57 धावांची सर्वोच्च खेळी केली तर स्पर्धेत बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव होण्यापूर्वी 40 च्या निरोगी सरासरीने एकूण 80 धावा केल्या. सोहेल अख्तरच्या नेतृत्वातील कलंदर संघात शाहीन शाह आफ्रिदी, फखर जमान, मोहम्मद हाफिज आणि हरीस रऊफ असे घातक गोलंदाज आहेत. पाकिस्तानी खेळाडूंशिवाय राशिद खान, डेविड विसे आणि समित पटेल असे परदेशी स्टार खेळाडू देखील कलांदर संघात सामील आहेत. नुकतंच संघाने आफ्रिदीच्या मागील दोन वर्षातील सातत्यपूर्ण कामगिरीचा विचार करून उपकर्णधारपदाच्या भूमिकेत बढती दिली. आफ्रिदी नेहमीप्रमाणे गोलंदाजीच्या आक्रमणाचे नेतृत्व करेल आणि संघाला महत्त्वपूर्ण वेळी विकेट मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

बेन डंक (Photo Credit: Instagram)

दरम्यान, कोविड-19 महामारीमुळे पीएसलचे सहावे सत्र स्थगित झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) स्पर्धेचे उर्वरित 21 सामने अबू धाबी (Abu Dhabi) येथे आयोजित केले जाणार असल्याची पुष्टी केली आहे. सर्व सामने यापूर्वी 1 जून रोजी आयोजित केले जाणार होते मात्र तारीख पुढे ढकलून अखेरीस यंदा, 9 जून रोजी सामन्यांची सुरुवात होणार आहे. लाहौर कलंदर विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.