
IND vs PAK, Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा संघ आज (१२ सप्टेंबर) ओमानसोबत आपला पहिला सामना खेळणार आहे. याच सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी आपल्या फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले असून, एका गोलंदाजाला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हटले आहे. Sanju Samson: संजू सॅमसनला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी 'अंतिम इशारा'; श्रेयस अय्यर घेणार जागा?
फिरकी गोलंदाजांबद्दल प्रशिक्षकांचे मोठे विधान
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना फिरकी गोलंदाजांमध्ये होईल का, असा प्रश्न जेव्हा माइक हेसन यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, “आमच्या संघाची खासियत ही आहे की आमच्याकडे ५ फिरकी गोलंदाज आहेत. जेव्हा तुमच्याकडे असे फिरकी गोलंदाज असतात, तेव्हा खेळपट्टीलाही महत्त्व उरत नाही."
माइक हेसन पुढे म्हणाले, "आमच्याकडे सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद नवाज आहे. आमच्याकडे अबरार आणि सूफियान देखील आहेत आणि अष्टपैलू सॅम अयूब सध्या जगातील टॉप-१० अष्टपैलू खेळाडूंमध्ये आहे."
याशिवाय, सलमान आगा सारखे चांगले कसोटी फिरकी गोलंदाजही आपल्याकडे आहेत, असे ते म्हणाले. "परिस्थिती अनुकूल राहिल्यास आमच्याकडे फिरकी गोलंदाजीचे अनेक पर्याय आहेत. आमच्याकडे ५ वेगवान गोलंदाज देखील आहेत, पण किती फिरकी गोलंदाजांना संधी मिळेल हे खेळपट्टीवर अवलंबून असेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्राय सिरीजमध्ये नवाजची शानदार कामगिरी
आशिया कप २०२५ च्या आधी पाकिस्तानने टी-२० ट्राय सिरीज खेळली होती, जी त्यांनी जिंकली. ट्राय सिरीजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद नवाजने अफगाणिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. याच शानदार कामगिरीमुळे हेसन यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. पाकिस्तानचा संघ आज रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ओमानविरुद्ध आपला पहिला आशिया कप सामना खेळणार आहे.