
IND vs PAK: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आशिया कप २०२५ मधील आपला दुसरा सामना खेळणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला 'अंतिम इशारा' मिळाला आहे. माजी भारतीय ओपनर आणि माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी केलेल्या एका दाव्यामुळे सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे, की संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवणे हे श्रेयस अय्यरच्या संभाव्य पुनरागमनाचे संकेत आहे.
'ही' शेवटची संधी, नाहीतर श्रेयस अय्यर घेणार जागा
ओपनर म्हणून यशस्वी ठरलेल्या संजू सॅमसनने या भूमिकेत ११ डावांमध्ये ३ शतकांसह ३२.६३ च्या सरासरीने ५२२ धावा केल्या आहेत. मात्र, पाचव्या क्रमांकावर त्याची आकडेवारी खूपच खराब आहे, जिथे त्याने २०.६२ च्या सरासरीने केवळ ६२ धावा केल्या आहेत. या आशिया कपमध्ये संजू पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल अशी अपेक्षा आहे, कारण शुभमन गिलने त्याच्या जागी सलामीला फलंदाजी केली होती.
आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये श्रीकांत यांनी दावा केला आहे की संजू सॅमसनला ५ व्या क्रमांकावर खेळवणे हे त्याच्यासाठी चांगले लक्षण नाही. त्यांनी केरळच्या या खेळाडूला आशिया कपमध्ये धावा करण्याची ताकीद दिली आहे, अन्यथा श्रेयस अय्यर त्याची जागा घेण्यासाठी तयार आहे.
श्रीकांत म्हणाले, "मला वाटते की संजूला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी देऊन ते श्रेयस अय्यरच्या संघात परतण्याचा मार्ग मोकळा करत आहेत. संजूने पाचव्या क्रमांकावर जास्त फलंदाजी केलेली नाही आणि त्याने त्या क्रमांकावर फलंदाजी करूही नये. यामुळे त्याचा आत्मविश्वास डगमगेल. मी त्याला स्पष्ट सांगू इच्छितो की ही त्याची शेवटची संधी आहे. जर त्याने पुढील एक किंवा तीन डावांमध्ये धावा केल्या नाहीत, तर श्रेयस अय्यर त्याची जागा घेईल."
मधल्या फळीत खेळवण्याच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह
श्रीकांत केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संजूला मधल्या फळीत खेळवण्याच्या भारताच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "ते संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळवत आहेत. ते त्याला फिनिशर म्हणून वापरतील का? नाही. तिथे हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे असतील. संजू पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करेल का, हा प्रश्नच आहे. तुम्ही संजू सॅमसनला जितेश शर्माच्या पुढे ठेवले आहे. या आशिया कपसाठी हे ठीक आहे, पण टी-२० विश्वचषकात काय होईल?"
श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धावांचा डोंगर उभारूनही 'कॉम्बिनेशन आणि बॅलन्स' चे कारण देत त्याला आशिया कप २०२५ च्या संघातून बाहेर ठेवण्यात आले होते. या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, आता श्रीकांत यांच्या या वक्तव्यामुळे यावर एक नवीन वाद सुरू झाला आहे.