जॉनी बेअरस्टो (Photo Credit: Getty Images)

इंग्लंडचा (England) संघ सध्या न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आहे. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात असून त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.अ‍ॅशेस मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडचा संघ आता न्यूझीलंड (New Zealand) विरूद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त फलंदाज जो डेन्ली याच्या जागी जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याचा कसोटी मालिकेत बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी बेअरस्टो कसोटी संघाचा भाग नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत चांगली कामगिरी करणारा अष्टपैलू जो डेन्ली (Joe Denly) दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे आणि बेअरस्टो हा पर्याय म्हणून संघात घेण्यात आले आहेत. (NZ vs ENG 4th T20I: डेव्हिड मालन याने इंग्लंडसाठी झळकावले सर्वात जलद टी-20 शतक, इयन मॉर्गन च्यासाथीने केला सर्वाधिक भागीदारीचा रेकॉर्ड)

ईसीबी (ECB) च्या निवेदनात म्हटले आहे की, न्यूझीलंड दौर्‍यावर टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी सराव करताना डेन्लीला दुखापत झाली होती, ज्यामधून तो आता सावरत आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी तो तंदुरुस्त होईल अशी त्यांना आशा आहे. रविवारी पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतरही बेअरस्टो न्यूझीलंडमध्ये राहील. मंगळवारपासून न्यूझीलंड क्रिकेट -11 विरुद्ध दोन सराव सामन्यांमध्ये तो भाग घेऊ शकेल. टी-20 संघात बेअरस्टोची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. मात्रबेअरस्टोने सराव सामन्यात इंग्लंडला चांगला डाव खेळत जिंकवून दिले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खराब कामगिरीमुळे बेअरस्टोला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सुरुवातीला निवडलेल्या संघातून वगळण्यात आले होते. पाच सामन्यांत त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले होते आणि त्याची सरासरी 23.77 होती. पहिला कसोटी सामना 21 नोव्हेंबरला बे ओव्हल तर दुसरा 29 नोव्हेंबरला हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल.

इंग्लंडचा टेस्ट संघ पुढीलप्रमाणे आहे: जो रूट (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॉक क्रोली, सॅम कारेन, जो डेन्ले, जॅक लीच, साकीब मेहमूद, मॅथ्यू पार्किन्सन, ओली पोप, डोमिनिक सिब्ली, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स.