Credit: X@T20WorldCup

ICC Women's T20 World Cup: 2024च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 साठी (Women's T20 World Cup) अंतिम सामना काल रविवारी झाला. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या खांद्यावर होती. तर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईनने केले. यंदाच्या विश्वचषकाचे वैशिष्ट्य म्हणजे न्यूझीलंडने (New Zealand Team) पहिल्यांदाच टी 20 विश्वचषक जिंकत इतिहास रचला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 16 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला.

यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली. न्यूझीलंड संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अमेलिया केरने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान अमेलिया केरने 38 चेंडूत चार चौकार मारले. अमेलिया केरशिवाय ब्रुक हॉलिडेने 38 धावा केल्या. (New Zealand Women Beat South Africa Women, Final Match Scorecard: अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून न्यूझीलंड बनला T20 वर्ल्ड चॅम्पियन, अमेलिया केरची अष्टपैलू खेळी)

अयाबोंगा खाकाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक दोन बळी घेतले. नॉनकुलुलेको म्लाबा व्यतिरिक्त क्लो ट्रायॉन, अयाबोंगा खाका आणि नादिन डी क्लर्क यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकात 159 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी झटपट 51 धावा फलकावर लावल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 126 धावा करू शकला.

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 160 धावा केल्या. तसेच भारताला 102 धावांवर गुंडाळलं आणि 58 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात भारताला मोठा धक्का देत विजयी टीम असल्याची साक्ष दिली होती. दुसऱ्या साखळी फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियने विजयासाठी 20 षटकात 8 गडी गमवून 148 धावा दिल्या होत्या. पण न्यूझीलंडला 88 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना ऑस्ट्रेलियाने 60 धावांनी जिंकला.

तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला 8 विकेट आणि 15 चेंडू राखून पराभूत केलं. श्रीलंकेने 20 षटकात 5 गडी गमवून 115 धावा केल्या आणि विजयासाठी 116 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान न्यूझीलंडने 17.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. चौथ्या सामन्यात पाकिस्तानशी लढत झाली. या सामन्यात खरं तर न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने 20 षटकात 6 गडी गमवून 110 धावा केल्या. पण पाकिस्तानला 56 धावांत गुंडाळण्यात यश आलं. न्यूझीलंडने हा सामना 54 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरी गाठली.

उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना अतितटीचा झाला. न्यूझीलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 128 धावा केल्या. हा धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 8 धावा तोकड्या पडल्या. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 गडी गमवून 120 धावा केल्या. अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेने चांगली सुरुवात केली. मात्र नंतर डाव गडगडला आणि न्यूझीलंडने विजय मिळवला.