Mental Health Issues: आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू मानसिक आजाराने त्रस्त, स्टार खेळाडूंच्या यादीत या युवा भारतीय क्रिकेटपटूचाही समावेश
आर्यमन बिर्ला (Photo Credit: Instagram)

Players Who Have Battled Mental Health Issues: आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंचे करिअर चढ-उताराने भरलेले असते त्यामुळे हे स्वाभाविक आहे की अ‍ॅथलीट्सच्या, ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसते अशा गोष्टींचा, मानसिक आरोग्यावर (Mental Health) गंभीर परिणाम होऊ शकतो. तथापि, अलीकडील काळात, क्रीडा जग बदलत आहे आणि बरेच खेळाडू पुढे येऊन मानसिक आरोग्याबाबत उघडपणे बोलत आहेत. नुकतंच आघाडीची टेनिसपटू नाओमी ओसाकाने  (Naomi Osaka) पॅरिस येथे सुरु असलेल्या फ्रेंच ओपन (French Open) ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिने स्पर्धेदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ती कुठल्याही पत्रकार परिषदेत भाग घेणार नसल्याचं घोषित केलं होतं. आपल्या या विधानावर ठाम राहत तिने पहिल्या फेरीतील विजयानंतर पत्रकार आणि माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. (Roland Garros 2021: Naomi Osaka ची स्पर्धेतून माघार, फ्रेंच ओपनदरम्यान माध्यमांशी बोलणे टाळल्यामुळे बसला होता 15,000 डॉलर्सचा दंड)

खेळाडूंकडून अनेकदा कृतज्ञता आणि दृढनिश्चय दर्शवण्याची अपेक्षा केली जाते, पण आपल्यातील बरेच लोक हे विसरतात की ते देखील शेवटी मानव आहेत आणि सतत सार्वजनिक प्रदर्शनासह - सकारात्मक किंवा नकारात्मक - त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकते. आज या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये एक ब्रेक घेतला. यामुळे त्याने उर्वरित श्रीलंका दौऱ्यावरून माघार घेतली पण काही महिन्यांनंतर तो आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर परतला आणि त्यानंतरच्या मैदानावर त्याने काही उत्कृष्ट प्रदर्शन केले.

सारा टेलर (Sarah Taylor)

इंग्लंडची विकेटकीपर-फलंदाजने मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली. “हा एक कठोर निर्णय घेण्यात आला परंतु मला आणि माझ्या आरोग्यासाठी हा योग्य निर्णय असल्याचे मला माहित आहे,” तिने सांगितले. सारा 10 कसोटी सामने, 126 वनडे आणि 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली.

आर्यमन बिर्ला (Aryaman Birla)

2018 आयपीएलपर्यंत राजस्थान रॉयल्सचा सदस्य असलेला आर्यमन बिर्लाने मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणार्‍या 22 वर्षीय आर्यमनने सोशल मीडियावर याची घोषणा केली. देशातील प्रमुख उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन म्हणाला आहे की, ‘मी आतापर्यंत खेळायचा प्रयत्न केला पण आता मानसिक आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा झाला आहे.’ आर्यमनने नऊ प्रथम श्रेणीचे सामने आणि चार List A सामने खेळले.

निक मॅडिनसन (Nic Maddinson)

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने मानसिक आरोग्याच्या समस्यांचे कारण देत नोव्हेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया A आणि पाकिस्तान यांच्यातील दौऱ्यातील तीन सामन्यांमधून माघार घेतली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मॅडडिन्सनच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आणि ते म्हणाले की, ‘त्यांच्या खेळाडूंची भलाई’ हीच प्राथमिकता आहे.

मार्कस ट्रेस्कोथिक (Marcus Trescothick)

इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने वैयक्तिक कारणे सांगून 2006 मध्ये भारत दौरा मधेच सोडला आणि नंतर त्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्वत: ला अनुपलब्ध केले आणि दोन खेळानंतर अ‍ॅशेस दौर्यातूनही माघार घेतली. ट्रेस्कॉथिकने नंतर हे उघड केले की त्या काळात तो मानसिक आरोग्याच्या प्रश्नांशी झगडत होता आणि पुनरावृत्तीच्या घटनांनंतरच त्याला याची जाणीव झाली.

अँड्र्यू फ्लिन्टॉफ

इंग्लंडचा आणखी एका खेळाडूला मानसिक आरोग्याने त्रस्त होता. 2005 च्या शानदार अ‍ॅशेस मालिकेनंतर फ्लिंटॉफ स्टार परफॉर्मर म्हणून उदयास आला. याने त्याला मद्यपान आणि नैराश्यात ढकलले. या दौऱ्यानंतर त्याने एकदा म्हटले होते की, “मी इंग्लंडचा कर्णधार होतो आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतो. तरीही जगातील सर्वात मोठ्या स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने बाहेर पडण्याऐवजी मला अंथरुणातुन बाहेर पडायचे नव्हते, लोकांना सामोरे जायचे नव्हते.”