माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या आर्थिक टंचाईचा सामना करत आहे. या आधी तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI ) निवृत्तिवेतनावर आपले घर चालवत असे. मात्र आता त्याच्यावर आर्थिक मदत मागण्याची नामुष्की ओढावली आहे. विनोद कांबळी याच्याबाबत माहिती कळताच एका मराठी उद्योजकाने त्याला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. संदीप थोरात असे या उद्योजकाचे नाव आहे. विदोन कांबळी हे आर्थिक संकटात असतीतल तर आपण त्यांना मदत करु शकतो. त्यासाठी त्यांना आपल्या उद्योग समूहाद्वारे (Sahyadri Udyog Samuha) नोकरीची ऑफर (Job Offer to Vinod Kambli) देतो आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे. थोरात हे सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनी चालवतात. आपल्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीची ऑफर त्यांनी कांबळी यांना दिली आहे.
उद्योजक संदीप थोरात हे मूळचे अहमदनगरचे आहेत. विनोद कांबळी हे जर सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीमध्ये नोकरीसाठी तयार असतील तर आपण त्यांना ऑफर देतो आहोत. विनोद कांबळी यांच्याशी अद्याप आपले बोलणे झाले नाही. आपण लवकरच त्यांची भेट घेणार आहोत, असे संदीप थोरात यांनी म्हटले आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्रति महिना 1 लाख रुपये इतक्या पगारावर आपण त्यांना नोकरी देऊ शकतो, असेही थोरात यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, माजी स्टार क्रिकेटर Vinod Kambli वर कोसळले आर्थिक संकट; BCCI च्या पेन्शनवर होत आहे कुटुंबाचे पालन पोषण, नोकरीच्या शोधात)
विनोद कांबळी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसोबत उतारवयात अशी वेळ येणे हे खरोखरच समाज म्हणून आपले अपयश असल्याची भावना संदीप थोरात यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात अनेक मोठे लोक होऊन गेले. आजही आहेत. परंतू, वृद्धापकाळात त्यांच्यावर अशी वेळच का येते हे खरोखरच मला समजत नाही, अशी खंत बोलून दाखवत थोरात पुढे म्हणाले की, सिंधुताई सपकाळांना देखील त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांसमोर पदर पसरुन जगावं लागलं. विनोद कांबळी यांच्यावरही आज तशीच वेळ आल्याचे दिसत आहे.
सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनी आगामी काळात मुंबईत आपल्या शाखा उघडत आहे. त्यामुळे या उद्योगाच्या व्यवसायविस्तारासाठी चांगल्या लोकांची गरज आहे. अर्थात क्रिकेट आणि फायनान्स हे विषय वेगवेगळे असले तरी त्यातही मायक्रो मॅनेजमेंट चालते. त्यामुळे त्या मॅनेजमेंटचा वापर ब्रँचच्या व्यवस्थापनासाठी अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो, असेही थोरात म्हणाले. त्यांनी क्रिकेटमध्ये जशी शिस्त दाखवून कामगिरी केली. तशीच ते नोकरीतही दाखवतील अशी आपेक्षा आहे. त्यामुळेच आपण त्यांना 1 लाख रुपये पगाराची नोकरी ऑफर करत आहोत, असे ते म्हणाले.