नशीब जेव्हा साथ देते तेव्हा चहूबाजूंनी धनाचा वर्षाव होतो, परंतु हेच नशीब जेव्हा काही घ्यायला येते तेव्हा सर्वकाही हिरावून नेते. असाच काहीसा प्रकार माजी स्टार क्रिकेटर विनोद कांबळीसोबत (Vinod Kambli) घडला आहे. विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच एक प्रकारची दहशत निर्माण केली होती आणि तो लंबी रेसचा घोडा मानला जात होता, पण नंतर विनोद कांबळीची गाडी रुळावरून अशी घसरली की, आज तो फार मोठ्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. सध्या विनोद कांबळीची स्थिती अशी आहे की, तो कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावरील कोणतेही काम करण्यास तयार आहे.
सचिन तेंडुलकरसोबत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यांच्याकडे घर चालवण्यासाठीही पैसे नाहीत. सध्या ते नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत हे सांगितले. 'मिड-डे' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळी म्हणाले, 'मी निवृत्त क्रिकेटर आहे आणि पूर्णपणे बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे. माझ्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत बीसीसीआय आहे आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे.’
‘बीसीसीआयच्या पेन्शनमुळेच माझ्या कुटुंबाचा खर्च चालतो. मला कामाची गरज आहे. मला माहित आहे की मुंबईने अमोल मजुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून ठेवले आहे, परंतु त्यांना माझी कोणत्याही प्रकारे गरज असल्यास मी उपलब्ध असेन. मी मुंबईसाठी खेळलो आहे आणि म्हणूनच त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावे अशी माझी इच्छा आहे. ही बाब मी मुंबई क्रिकेट असोसिएशनलाही सांगितली आहे.’ (हेही वाचा: व्हीलचेअरवर बसून चौकार आणि षटकार मारणाऱ्या 'या' क्रिकेटपटूला आता चालवायला लागते ई-रिक्षा)
सचिन तेंडुलकरकडून मदत घेण्याच्या प्रश्नावर कांबळी म्हणतात, ‘सचिनला माझी अवस्था माहीत आहे. याआधीही त्याने मला मदत केली आहे. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल असाईनमेंट दिली. तो माझा खूप चांगला मित्र राहिला आहे. मला आता त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नाही.’
विनोद कांबळीने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या 1084 धावा आणि कसोटीत 2477 धावा आहेत. लहानपणी ते सचिनसोबत क्रिकेट खेळायचे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवातही दमदार पद्धतीने केली पण नंतर आपला फॉर्म ते कायम राखू शकले नाही आणि संघाबाहेर गेले.