ICC Test Championship Points Table: भारतविरुद्ध क्लीन स्वीपनंतर न्यूझीलंडने गुणतालिकेत घेतली भरारी, पाहा टीम इंडियाची स्थिती
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) संघात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यात यजमान टीमने 7 विकेटने विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केला. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप (ICC Test Championship) दरम्यान खेळण्यात आलेल्या या मालिकेनंतर गुणतालिकेत महत्पूर्ण बदल झाले आहे. भारताचा टेस्ट चॅम्पियनशिपमधील हा दुसरा पराभव ठरला. यापूर्वी वेलिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात भारताला 10 विकेटने लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताने आजवर 4 सामन्यांमध्ये 7 विजयासह 360 गुण मिळवले आणि अव्वल स्थान कायम ठेवले आहे. भारताच्या क्रमवारीत बदल झाला नसला तरी या विजयाने न्यूझीलंडला फायदा झाला आहे. किवी टीमने या मालिकेतून एकूण 120 गुणांची कमाई केली आणि गुणतालिकेत झेप घेत तिसरे स्थान मिळवले. (IND vs NZ 2nd Test 2020: क्राइस्टचर्चमध्ये भारताचा दारून पराभव, न्यूझीलंडने 2-0 ने केलं क्लीन स्वीप)

न्यूझीलंडने टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये 3 मालिकांमधून एकूण 180 गुण मिळवले. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या तीन संघात न्यूझीलंडचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडच्या पुढे 296 गुणांसह ऑस्ट्रेलिया आहे. इंग्लंड 146 गुणांसह चौथ्या आणि पाकिस्तान 140 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी ही फारशी संस्मरणीय मालिका नव्हती. कोहलीने 11 डावांमध्ये केवळ 218 धावा फटकावल्या आणि तीनही स्वरूपात असलेल्या या दौऱ्यावरील ही त्याच्यासाठी सर्वात कमी धावा ठरली. यापूर्वी कोहलीने 2014 च्या इंग्लंड दौऱ्यावर 254 धावा केल्या होत्या. टी-20 मालिकेमध्ये भारताने न्यूझीलंड दौर्‍याची सुरुवात 5-0 च्या व्हाईटवॉशने केली होती पण त्यानंतर यजमानांनी वनडे मालिकेत पुनरागमन करत 3-0 ने विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडने विजयाचे सत्र सुरु ठेवले. क्राइस्टचर्च येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने 7 विकेटने सामना जिंकला आणि मालिकेत 2-0 क्लीन स्वीप केला. वनडेनंतर न्यूझीलंडचा भारताविरुद्ध हा सलग दुसरा क्लीन स्वीप ठरला.