भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघातील क्राइस्टचर्च स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी किवी टीमने 7 विकेटने भारताचा परभाव केला आणि मालिका 2-0 ने जिंकली. पाच दिवसाचा सामना तीन दिवसांच्या आत संपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टॉम लाथम (Tom Latham) आणि टॉम ब्लंडेलने (Tom Blundell) अर्धशतकी कामगिरी केली.  लाथमने 52 आणि ब्लंडेलने 55 धावा केल्या. भारताने दिलेल्या 132 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 3 विकेट गमावल्या. केन विल्यमसन दुसऱ्या डावातही कमाल करू शकला नाही, त्याने 5 धावा केल्या. रॉस टेलर 5 आणि हेन्री निकोल्स 5 धावा करून नाबाद परतले. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2 आणि उमेश यादवने (Umesh Yadav) 1 गडी बाद केला. यापूर्वी पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 10 विकेटने विजय मिळवला होता. भारताच्या फलंदाजांनी यंदा टेस्ट दौऱ्यावर निराशाजनक कामगिरी केली. न्यूझीलंड दौऱ्यावरील भारताचा हा सलग दुसरा क्लीन स्वीप ठरला. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव 242 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. भारताने पहिल्या डावाच्या जोरावर 7 धावांची आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. संपूर्ण संघ 124 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य दिले. (IND vs NZ 2020: न्यूझीलंडविरुद्ध मालिकेने खराब केला विराट कोहली चा संपूर्ण 'खेळ', या दौऱ्यावरील त्याची कामगिरी जाणून घ्या)

भारताकडून चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात सर्वाधिक 24 धावा केल्या. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि कर्णधार विराट कोहलीने प्रत्येकी 14 धावा केल्या. रवींद्र जडेजा 16 धावांवर नाबाद परतला. यंदाचा किवी दौरा कोहलीसाठी अक्षम्य राहिला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध सर्व तीनही स्वरूपात 218 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट ने 4 आणि टीम साऊथीने 3 गडी बाद केले. दुसऱ्या डावात भारताचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 90 धावांवर 6 गडी गमावले होते. नाईट वॉचमन म्हणून आलेला उमेश यादव एक धाव करुन बाद झाला.

न्यूझीलंड रविवारी पहिल्या डावात 235 धावांवर ऑलआऊट झाला. लाथमने पहिल्या डावात अर्धशतकी कामगिरी केली. त्याने 52 धावा केल्या. काईल जैमीसन 49 आणि ब्लेंडलने 30 धावा केल्या. मोहम्मद शमीने भारताकडून सर्वाधिक 4, जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजाने 2 आणि उमेशने 1 गडी बाद केला. भारताकडून पहिल्या डावात पृथ्वी शॉने 54, हनुमा विहारीने 55 आणि पुजाराने 54 धावा केल्या. दुसरीकडे, किवी टीमकडूनजैमीसनने टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदा पाच विकेट्स घेतल्या.