IND vs WI: विराट कोहलीसमोर मोठं आव्हान, वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी हे 4 आहे दावेदार
(Photo Credit: Getty Images)

भारतीय संघ (Indian Team) सध्या क्रिकेट विश्वातील सर्वात मजबूत संघ मानला जात आहे. सध्याच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा मजबूत संतुलन आहे. विश्वचषकनंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा विंडीज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. यादरम्यान भारत (India) आणि विंडीज संघ 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट मालिका खेळतील. भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी त्यांच्या मधल्या फळीने अनेक वेळा त्यांना निराश केले आहे. विश्वचषकमध्ये देखील सेमीफायनल आणि काही साखळी सामन्यात भारताची मधली फळी त्यांना साजेशी खेळी करू शकली नाही. परिणामी संघाने काही महत्वाचे सामने गमावले. (IND vs WI: हे 5 वेस्ट इंडिज खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात धोकादायक, भारताचा मार्ग कठीण होण्याची शक्यता)

आगामी विंडीज दौऱ्यासाठी देखील भारतासमोर हाच प्रश्न आहे की टी-20 आणि वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोण. भारत-वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. यासाठी भारतीय संघात 4 खेळाडू आहे जे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. के एल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), मनीष पांडे (Manish Pandey) आणि रिषभ पंत (Rishabh Pant). हे चारही फलंदाज चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यास सक्षम आहे.

टीम इंडिया सध्या पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रशिक्षित करणार आहे. त्यामुळे या क्रमांकावर त्याचे स्थान पक्के मानले जात आहे. पण सध्या पंतचा फॉर्म चांगला नाही आहे. विश्वचषकमध्ये देखील तो चांगली खेळी करू शकला नाही. अशा परिस्थितीत राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. शिवाय तो पंतप्रमाणेच विकेटकीपर देखील आहे. पंतची विकेटकिपिंग शैली देखील अशक्त आहे तर राहुल एम एस धोनी (MS Dhoni) सारखाच चपळ आहे. राहुलने विश्वचषकमध्ये उत्कृष्ट खेळी केली होती आणि सध्या तो फॉर्ममध्ये देखील आहे. त्यामुळं पंतला फक्त विकेटकिपर म्हणून संघात घेतले जाऊ शकते.

दुसरीकडे, जर भारत 'ए' संघातील खेळाडूंना संधी देण्यात आली तर मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर एक उत्तम पर्याय आहे. मनीषने नुकतेच भारत 'ए' साठी वेस्ट इंडिज 'ए' विरद्ध साजेशी कामगिरी केली होती. आणि याचमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. श्रेयस आणि मनीष यांच्यातील एकाला चौथ्या क्रमांकावर खेळवायचे असल्यास मनीष उत्रकृष्ट खेळाडू आहे. तर श्रेयस हा तिसऱ्या क्रमांकावरील उपयुक्त फलंदाज आहे.