IND vs WI ODI 2019: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेतून शिखर धवन आऊट, मयंक अग्रवाल याला मिळाली संधी
शिखर धवन आणि मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty Images)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याची बुधवारी जखमी झालेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याची वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध आगामी वनडे मालिकेसाठी निवड केल्याची घोषणा केली. बुधवारी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने जखमी धवनच्या जागी मयंकचा भारतीय संघात समावेश केला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका सामन्यादरम्यान दिल्लीचा सलामीवीर शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे, धवनला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेलाही मुकावे लागले होते. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने धवनची तपासणी केली असता त्याची दुखापत हळू हळू बरी होत असल्याचे आढळून आले, पण संपूर्ण तंदुरुस्तीसाठी त्याला आणखी काही काळ हवा होता. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका 15 डिसेंबरपासून चेन्नईमध्ये सुरू होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 18 डिसेंबरला विशाखापट्टणम तर तिसरा आणि अखेरचा सामना 22 डिसेंबरला कटकमध्ये खेळला जाईल. (KulCha सह रोहित शर्मा याचा रॅपिड फायर, हिटमॅनच्या प्रश्नांना कुलदीप यादव-युजवेंद्र चहल ने दिले मजेशीर उत्तरं, पाहा Video)

दरम्यान, जर मयंकला वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर तो त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतराष्ट्रीय वनडे सामना खेळेल. मयंकने आजवर 9 कसोटी सामन्यांच्या 13 डावांमध्ये 3 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. गेल्या महिन्यात त्याने बांग्लादेशविरुद्ध इंदोर सामन्यात 243 धावांचे दुहेरी शतक झळकावले होते. दुसरीकडे, दोन्ही संघात आज टी-20 मालिकेतील अंतिम लढत होणार आहे. भारत आणि विंडीजमधील तिसरा आणि अंतिम टी-20 सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. दोन्ही संघातील मालिका सध्या 1-1 ने बरोबरी आहे.

विंडीजविरुद्ध वनडेसाठी टीम इंडिया अश्याप्रकारे आहे: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.