रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याला वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात (Indian Team) स्थान मिळालेले नाही. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयाने सर्वांनाच चकीत केले कारण याआधी अश्विनची वेस्ट इंडिजविरुद्धची कामगिरी चांगली आहे. भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) देखील या निर्णयाबद्दल जाणून चकित झाले आणि म्हणाले की, "या निवडीमुळे मला खूप आश्चर्य वाटले." अश्विनऐवजी रोहित शर्मा याला देखील संघात स्थान मिळाले नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) याने रोहित आणि अश्विनला संघात का घेतलं नाही याचा खुलासा केला आहे. अश्विनने विंडीज संघाविरुद्ध 11 टेस्ट सामन्यांत 4 शतकांसह 552 धावा केल्या आहेत. शिवाय, त्याने 60 विकेट्स देखील घेतले आहेत. गावस्कर याबद्दल म्हणाले, "ज्या खेळाडूचा असा विक्रम आहे, त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे." (IND vs WI 1st Test Day 1: रविचंद्रन अश्विन याला Playing XI मधून वगळल्याने भडकले नेटिझन्स, म्हणाले ही सर्वात 'विचित्र निवड')
यावर संघाचा उपकर्णधार रहाणे म्हणाला की, "परिस्थिती पाहून संघाने रोहित आणि अश्विन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या गरजा पाहून घेण्यात आला आहे. हा निर्णय सोप्पा नव्हता, मात्र संघ व्यवस्थापनाला संघाचे संतुलन साधायचं असतं. जडेजा एक योग्य पर्याय ठरू शकतो म्हणून त्याला संघात घेण्यात आले. संघ व्यवस्थापनाला वाटले की जडेजाला या विकेटसाठी चांगला पर्याय असेल कारण आम्हाला सहाव्या फलंदाजाची गरज आहे जो गोलंदाजीसुद्धा करू शकेल. तसेच हनुमा विहारी पर्यायी गोलंदाज म्हणून कामगिरी पार पाडू शकतो. प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात याबद्दल चर्चा झाली. असं फार कमी होतं की जेव्हा अश्विन आणि रोहित सारख्या खेळाडूंना टीम बाहेर बसावे लागतात पण, हे सर्व टीमसाठी असतं."
दरम्यान, विंडीजविरुद्ध पहिल्या टेस्ट दिवसअखेर भारताने 6 बाद 203 धावा केल्या. भारताची आघाडीची फळी पहिल्या डावात अपयशी ठरली. पहिले तीन फलंदाज 25 धावांवर तंबूत परतले. त्यानंतर रहाणेने संयमी खेळी करत डाव सावरला. शिवाय त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला 200 धावांचा टप्पा पार करू दिला. त्याने 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.