IND vs SL Pink-Ball Test Day 2: भारतीय क्रिकेट विश्वात सध्या माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाची चर्चा रंगली आहे. बांग्लादेशविरुद्द 2020 मध्ये अंतिम शतक केलेला विराट अनेक प्रसंगी शतकी धावसंख्येनजीक पोहोचला होता, मात्र पल्ला गाठण्यात अपयशी ठरला. 2021 टी-20 विश्वचषकनंतर टी-20 त्यानंतर वनडे आणि कसोटी कर्णधार म्हणून संघाबाहेर पडल्यावर नेतृत्वाचा भार उतरल्यावर विराट आता मुक्तपणे खेळून शतकी खेळी करेल असे अपेक्षित होते, पण अद्याप तसे झाले नाही. एकीकडे कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा लांबणीवर पडत असताना एक खेळाडू आहे ज्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे आणि तो म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). ‘कॅप्टन’ रोहित शर्माने 2022 मध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, पण फलंदाज म्हणून त्याची कामगिरी काही खास नाही. (IND vs SL: विराट कोहली याला 5 वर्षानंतर ‘हा’ दिवस पाहायला भाग पडले, धावांअभावी अप्रतिम आकड्यांमध्ये झाला मोठा उलटफेर)
श्रीलंकेसारख्या दुबळ्या संघाविरुद्धही रोहित अप्रतिम कामगिरी करू शकला नाही. 2022 मधील आतापर्यंतचे त्याचे आकडे खराब दिसत आहेत. तो एका शतकापासून खूप दूर आहे, तर या वर्षात अर्धा डझन डावांमध्ये त्याने एकमेव अर्धशतक ठोकले आहे. रोहित शर्मासारख्या खेळाडूसाठी हे आकडे फारच लाजिरवाणे आहेत. रोहितने चालू वर्षी आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 12 डावात केवळ 284 धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत त्याची सरासरी 23.66 आहे, तर त्याने 94.35 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. स्ट्राईकरेट 100 पेक्षा कमी असताना प्रश्न उद्भवतो कारण त्याने 9 मर्यादित षटकांचे सामने खेळले आहेत ज्यात त्याने 9 डावात फलंदाजी केली आहे. इतकंच नाही तर याद्यांमध्ये केवळ एका डावात त्याने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. याशिवाय त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही.
उल्लेखनीय आहे की रोहितने या वर्षाच्या सुरुवातीला मर्यादित षटकांचा नियमित कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला आणि प्रथमच वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे व टी-20 मालिका जिंकली. तसेच त्याने श्रीलंकेविरुद्ध सलग टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आणि त्यानंतर मोहाली कसोटी सामन्यातही विजयाचा झेंडा फडकावला. अशा प्रकारे तो कर्णधार म्हणून यशस्वी होत असला तरी त्याच्या बॅटची धार निसटताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता त्याला त्याची लय आयपीएलमध्ये शोधावी लागेल.