IND vs SL: विराट कोहली याला 5 वर्षानंतर ‘हा’ दिवस पाहायला भाग पडले, धावांअभावी अप्रतिम आकड्यांमध्ये झाला मोठा उलटफेर
विराट कोहली (Photo Credit: PTI)

Virat Kohli Test Average Falls: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा व शेवटचा सामना बेंगलोर (Bangalore) येथे खेळला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस असून टीम इंडिया (Team India) दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरली आहे. दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पुन्हा आपल्या फलंदाजीने निराश केले. पिंक-बॉल कसोटीत (Pink-Ball Test) तो शतक झळकावेल अशी अपेक्षा होती, पण शतक तर सोडाच पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही डावात त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नाही. यासह आता कोहलीला तो दिवस पाहायला लागला आहे जो त्याने गेल्या चार-पाच वर्षांपासून पाहिला नव्हता. गेल्या अडीच वर्षांपासून 71व्या शतकाची प्रतीक्षा केली जात आहे, जी अद्याप संपलेली नाही आणि आता काहीतरी घडले आहे ज्याची अपेक्षा कदाचितच कोणाला होती. (IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका गोलंदाजांचा समाचार घेत Rishabh Pant याने इतिहास रचला, बनला सर्वात जलद टेस्ट अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज)

5 वर्षांनंतर श्रीलंकेने विराट कोहलीच्या आकड्यांना पुन्हा दणका दिला आहे. कोहलीची कसोटी सरासरी अवघ्या 7 धावांनी खालावली आहे. बंगळुरूच्या आपल्या दुसऱ्या ‘होम ग्राउंड’वर खेळूनही विराटला फारसा फायदा झाला नाही. श्रीलंकेविरुद्ध दिवस/रात्र कसोटीच्या दोन दिवसांत विराटला दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्ही वेळा त्याच्या आवडत्या मैदानाची खेळपट्टीने त्याच्यासोबत ‘खेळ’ केला. कोहलीला त्याची कसोटी सरासरी पन्नासच्या वर ठेवण्यासाठी दुसऱ्या कसोटीत 43 धावांची गरज होती पण माजी कर्णधार फक्त 36 धावाच करू शकला. बेंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने 16 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 13 धावाच करता आल्या. यामुळे आता कोहलीची कसोटी सरासरी 50 च्या खाली आली आहे, जी गेल्या चार वर्षांपासून कधीही आली नव्हती. सप्टेंबर 2017 पासून विराट कोहलीची सरासरी 50 च्या खाली गेली नव्हती.

श्रीलंकेविरुद्ध बेंगलोर कसोटी सामन्यात शतक नाही तर विराट कोहली किमान मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. विराटची कसोटी सरासरी आता 49.96 वर आली आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे वनडे आणि टी-20 मध्ये त्याची सरासरी अजूनही 50 पेक्षा जास्त आहे. वनडेमध्ये त्याची सरासरी 58.07 आहे, तर टी-20 मध्ये 51.50 आहे. एक वेळी अशी होती की तो जगातील एकमेव फलंदाज होता ज्याची तिन्ही फॉरमॅटमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त होती, पण आज तो आऊट होताच ते चित्रही भंग झाले आहे. लक्षात घ्यायचे की विराटने 2020 मध्ये बांगलादेशविरुद्ध अंतिम दिवस/रात्र कसोटी अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.