IND vs SA 3rd Test Day 2: दक्षिण आफ्रिका (South Africa)आणि भारत (India) यांच्यात केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात केलेल्या 233 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 210 धावांत गुंडाळून भारताने 13 धावांची माफक आघाडी घेत दिवसाचा खेळ संपला तेव्हा दोन विकेट गमावून 57 धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाखेरीस यजमानांवर 70 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाखेरीस भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 धावा आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 14 धावा करून नाबाद खेळत आहेत. यापूर्वी भारताकडून जसप्रीत बुमराहने अर्धा आफ्रिकी संघ पॅव्हिलियनमध्ये पाठवला. तर दक्षिण आफ्रिकेसाठी झुंजार फलंदाजी करणारा कीगन पीटरटरसनने 72 धावा केल्या. पीटरसन आऊट होताच आफ्रिकेच्या अन्य देखील भारतीय गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. (IND vs SA 3rd Test Day 2: कसोटी क्रिकेटमध्ये Virat Kohli ने पूर्ण केले ‘हे’ खास शतक, अशी कमाल करणारा ठरला सहावा भारतीय)
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने एडन मार्करामला बाद करून दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. यानंतर उमेश यादवने केशव महाराजला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. तथापि रॅसी व्हॅन डर डुसेनला साथीला घेत पीटरसनने अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. दोघे दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी खेळी करतील असे दिसत असताना पीटरसन आणि डुसेनची जमलेली जोडी उमेश यादवने फोडली आणि त्याने 21 धावांवर डुसेनला बाद केले. यानंतर दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मोहम्मद शमीने आपल्या षटकात पहिले टेंबा बावुमा आणि काइल वेरेन यांना तंबूत पाठवले. मार्को जॅन्सन देखील फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि 7 धावांवर बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. बुमराहने पीटरटरसनला झेलबाद केले आणि संघाला आठवे यश मिळवून दिले. अखेरीस बुमराहने तळाला फलंदाजीला उतरलेला राबाडाला 15 धावा तर एनगिडीला 3 धावांवर बाद करूनआफ्रिकेचा डाव 210 धावांवर संपुष्टात आणला आणि भारताला 13 धावांची निसटती आघाडी मिळवून दिली.
प्रत्युत्तरात, टीम इंडिया पुन्हा एकदा दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरली. पण सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल संघाला चांगली सुरुवात मिळवून देऊ शकले नाही. मयंक अग्रवाल 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल देखील 10 धावांवर माघारी परतला. अशा परिस्थितीत आता तिसऱ्या दिवशी कोहली आणि पुजारावर पुन्हा एकदा संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असेल.