मोहम्मद सिराज आणि आर अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 2: जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजताना दिसला. या दुखापतीमुळे सिराजला पहिल्या दिवशी केवळ 3.5 षटकेच टाकता आली. त्याचे ओव्हर शार्दुल ठाकूरने पूर्ण केले. सिराजच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची (Team India) डोकेदुखी वाढली आहे, पण टीम इंडियाचा सीनियर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) आशा आहे की, सिराज दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करू शकेल. टीम इंडियाचा वरिष्ठ ऑफ-स्पिनर अश्विनने सिराजच्या दुखापतीबद्दल खुलासा करताना सांगितले की वैद्यकीय संघ रात्रभर भारतीय वेगवान गोलंदाजाचे मूल्यांकन करत आहे. अश्विन म्हणाला की, मला आशा आहे की सिराज मैदानावर उतरेल आणि सध्याच्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करेल. उल्लेखनीय म्हणजे, दुखापतीच्या प्रमाणात बीसीसीआयने अद्याप अधिकृत विधान केलेले नाही. (IND vs SA 2nd Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?)

“मी जाण्यापूर्वी विचारले की मी याबद्दल बोलू शकतो का. वैद्यकीय कर्मचारी रात्रभर त्याचे मूल्यमापन करत आहेत. मला आशा आहे की सिराजच्या इतिहासामुळे तो मैदानावर येऊन सर्वोत्तम कामगिरी करू शकेल,” आर अश्विनने जोहान्सबर्गमधील दिवसांच्या खेळानंतर पत्रकारांना सांगितले. जेव्हा सिराज दिवसाचे चौथे षटक टाकत होता तेव्हा त्याला दुखापत झाली ज्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. सामन्याबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी वाँडरर्स येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला 202 धावात गुंडाळले. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपला दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या मार्को जॅन्सनने 17 षटकांत 31 धावांत 4 विकेट अशी प्रभावी खेळी केली.

सेंच्युरियन कसोटी 113 धावांनी जिंकल्यानंतर जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली. पाठीत समस्या असल्याने विराट कोहली खेळत नाही आणि त्याच्या जागी केएल राहुल नेतृत्व करत आहे. राहुलने 50 आणि आर अश्विनने 46 धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला फारसे योगदान देता आले नाही. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटच्या मोबदल्यात 35 धावा केल्या असून ते अजूनही पहिल्या डावात 167 धावांनी पिछाडीवर आहेत, पण त्यांच्या खात्यात नऊ विकेट शिल्लक आहेत.