IND vs NZ Series Schedule 2021: विश्वचषकनंतर भारत-न्यूझीलंडमध्ये पुन्हा होणार लढत, टी-20 आणि कसोटीमध्ये होणार घमासान; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
डॅरिल मिशेल (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

IND vs NZ Series Schedule 2021: आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 संपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या रूपाने जगाला एक नवा T20 विश्वविजेता मिळाला आहे. या विश्वचषकात भारताची  (India) कामगिरी निराशाजनक होती. विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाला सुपर 12 टप्प्याच्या पुढेही जाता आले नाही. मात्र आता भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) त्याला मागे टाकून नवी सुरुवात करणार आहे. संघाला टी-20 मध्ये नवा कर्णधार आणि प्रशिक्षक मिळाला आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवा कर्णधार तर राहुल द्रविड संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. हे दोघेही न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध टी-20 मालिकेतून संघाची जबाबदारी सांभाळतील आणि संघाला एका नव्या आयामावर घेऊन जाण्यास प्रयत्नशील असतील. विश्वचषकच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर (NZ Tour of IND) येणार आहे. (IND vs NZ T20I 2021: न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या 6 खेळाडूंची होणार अग्निपरीक्षा, मालिकेत स्वतःला सिद्ध करण्याचा असेल दबाव)

T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत पोहोचलेला न्यूझीलंड पहिला संघ आहे. केन विल्यमसनच्या किवी संघासाठीही भारत दौरा जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेव्यतिरिक्त दोन सामन्यांची कसोटी मालिकेत आमनेसामने भिडतील. पहिला टी-20 सामना जयपूरमध्ये होणार असून त्यासाठी भारतीय संघ तिथे पोहोचला आहे. तसेच मालिकेतील दोन टी-20 सामन्यांसाठी प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक कसे आहे आणि सामने कुठे खेळले जातील याचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत.

तीन सामन्यांची टी-20 मालिका

पहिला सामना - बुधवार, 17 नोव्हेंबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर, वेळ - संध्याकाळी 7 वाजता

दुसरा सामना - शुक्रवार, 19 नोव्हेंबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, JSCA इंटरनॅशनल स्टेडियम रांची, वेळ - संध्याकाळी 7 वाजता

तिसरा सामना- रविवार 21 नोव्हेंबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता, वेळ - संध्याकाळी 7 वाजता

दोन सामन्यांची कसोटी मालिका

पहिला सामना, 25 ते 29 नोव्हेंबर, भारत आणि न्यूझीलंड, ग्रीन पार्क, कानपूर, सकाळी 9:30 वाजता

दुसरा सामना, 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर भारत आणि न्यूझीलंड, वानखेडे स्टेडियम, मुंबई, सकाळी 9:30 वाजता