IND vs NZ 5th T20I: न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा याची विक्रमी बॅटिंग, 14,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा बनला 8 वा भारतीय
रोहित शर्मा (Photo Credit: IANS)

यजमान न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) संघात मालिकेतील पाचवा अंतिम टी-20 सामना माउंट मौंगानुई (Mount Maunganui) येथील बे ओव्हल क्रिकेट मैदानात खेळला जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध क्लीन-स्वीप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टीम इंडियाने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजच्या या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात फ्लॉपनंतर तिसर्‍या सामन्यात रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या सर्वांमध्ये आता रोहितने एका खास रेकॉर्डची नोंद केली आहे. रोहित 14 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा आठवा भारतीय फलंदाज बनला आहे. (न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत रिषभ पंत ला न खेळवण्यार वीरेंद्र सेहवाग तोडले मौन, जुन्या वादाबद्दल खुलासा करत एमएस धोनीवर लगावला मोठा आरोप)

न्यूझीलंडविरुद्ध आजच्या सामन्यात 39 धावा करताच रोहितने 14,000 धावांचा टप्पा गाठला. आणि हा पराक्रम करणारा तो आठवा भारतीय फलंदाज बनला. या सामन्यापूर्वी रोहितने टेस्टमध्ये 2141, वनडेत 9115 आणि 2713 टी-20 धावा केल्या होत्या. रोहितपूर्वी भारताच्या सात फलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. मोहम्मद अझरुद्दीन, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सौरव गांगुली, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी 14 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या टी-20 मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. आणि आजच्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर 5 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करणारा तो पहिला संघ ठरेल. इतकाच नाही तर, रोहितने आज आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांची नोंद केली. रोहितचे 25 वे टी-20 अर्धशतक होते.