टॉम लाथम, टॉम ब्लंडेल (Photo Credit: Twitter/ICC)

हेगले ओव्हलमध्ये यजमान न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) मध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाची घोषणा झाली आहे.दुपारच्या जेवणापर्यंत न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 46 धावा केल्या आहेत. ही कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 86 धावांची आवश्यकता आहे. टीमकडून टॉम लाथम (Tom Latham) 16 आणि टॉम ब्लंडेल (Tom Blundell) 23 धावा करून खेळत आहेत. दिवसाच्या सुरुवातीला भारताचा दुसरा डाव 124 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 24 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 4 आणि टिम साऊथीने 3 गडी बाद केले. न्यूझीलंडला मालिका 2-0 ने जिंकण्यासाठी 132 धावांची आवश्यकता आहे. टीम इंडियाने 90/6च्या पुढे सोमवारी तिसर्‍या दिवसाचा खेळ सुरू केला. दिवसाच्या सुरुवातीला भारताने पहिल्या तासांत 4 विकेट्स गमावल्या. (IND vs NZ: हेगले ओव्हल मैदानाबाहेर लहान मुलाने केली जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल, BCCI ने शेअर केला Video)

रविवारी न्यूझीलंडकडून पहिल्या डावात लाथमने 52, काईल जैमीसन (Kyle Jamieson) 49 आणि ब्लेंडलने 30 धावा केल्या. जैमीसनने नील वॅग्नरबरोबर 9 व्या विकेटसाठी 51 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि भारताला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पहिल्या डावाच्या आधारे भारताला सात धावांची आघाडी मिळाली होती. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 235 धावांवर ऑलआऊट केले आणि 7 धावांची आघाडी घेतली. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजाने 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारतीय संघातील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने अवघ्या 90 धावांवर 6 गडी गमावले आणि 97 धावांची आघाडी घेतली होती.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताला पहिले फलंदाजी करण्यास सांगत किवी गोलंदाजांनी त्यांना पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात न्यूझीलंड पहिल्या डावात 235 धावांच करू शकला. गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, पण भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले.  पहिल्या डावात पृथ्वी शॉने 54, हनुमा विहारीने 55 आणि पुजाराने 54 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून पहिल्या डावात काईल जैमीसनने 5 गडी बाद केले. टेस्ट कारकिर्दीत जैमीसनने पहिल्यांदा 5 विकेट्स घेतल्या.