IND vs NZ 2nd Test Day 2: भारताची घातक गोलंदाजी; न्यूझीलंड 235 धावांवर ऑलआऊट, भारताकडे 7 धावांची आघाडी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय (India) गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केली आणि यजमान संघाला दुसऱ्या सत्रात 235 धावांवर ऑलआऊट केले. या दृष्टीने टीम इंडियाला 7 धावांची आघाडी मिळाली. टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला. दिवसाच्या सुरूवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावलेल्या किवी टीमने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 5 विकेट गमावल्या. पहिल्या डावात न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद शमी (Mohammed Shami) 4, जसप्रीत बुमराह 3, रवींद्र जडेजा 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या टॉम लाथम (Tom Latham) ने 52, काईल जैमीसन (Kyle Jamieson) 49 आणि टॉम ब्लेंडल (Tom Blundell) 30 धावा केल्या.(IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्च मॅच दरम्यान आक्रमक झाला विराट कोहली, प्रेक्षकाकडे बघून दिली संतापजनक प्रतिक्रिया Video)

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने 142 धावांवर पाच विकेट्स गमावल्या. दिवसाच्या सुरुवातीपासून भारताच्या गोलंदाजांनी विकेट घेण्याचे सत्र सुरूच ठेवले. टॉम ब्लंडेल 30, रॉस टेलर 15 आणि हेन्री निकोल्सने 14 धावा केल्या. केन विल्यमसन 3, बीजे वॅटलिंग आणि टिम साऊदी शून्यावर बाद झाले. बुमराहने वॅटलिंग आणि साऊदीला एकाच ओव्हरमध्ये बाद केले.  जैमीसन आणि ग्रैंडहोमने डाव पुढे नेला. ग्रैंडहोमने 26 धावा केल्या. नील वॅग्नरने जैमी सनला चांगली साथ दिली. दोघे मोठे शॉट्स खेळत असताना वॅग्नरला 21 धावांवर शमीने जडेजाकडे झेलबाद केले. दोंघांनी सावध डाव खेळला आणि टीमची धावसंख्या 200 पार नेली. जैमीसन आणि वाग्नरमध्ये नवव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. जैमीसनने अखेरच्या काही क्षणात काही महत्वपूर्ण शॉट्स मारले, पण त्याचे टेस्ट करिअरमधील पहिले अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही आणि 49 धावा करून पंतकडे झेलबाद झाला.

पहिल्या दिवशी पुन्हा एकदा भारतीय संघाची फलंदाजी अपयशी ठरली आणि संपूर्ण संघ पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला फक्त 3 धावा करता आल्या. सलामीवीर पृथ्वी शॉने चांगली खेळी खेळत 54 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनीही अर्धशतकं झळकावली. पहिल्या दिवशी न्यूझीलंडकडून दुसरा सामना खेळणाऱ्या काईल जैमीसनने 5 गडी बाद केले.