कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर 25 नोव्हेंबरपासून भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून भारताला दोन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धारित असेल. भारतीय संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. टीम इंडियाच्या (Team India) 16 सदस्यीय संघात अशा धाडसी गोलंदाजाचा समावेश आहे, जो स्वबळावर भारतासाठी सामने जिंकू शकतो. भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) शानदार लयीत आहे. गेल्या काही वर्षभरात अक्षर पटेलने टीम इंडियात आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांसारखे ज्येष्ठ अनुभवी ऑफस्पिनर संघात असूनही त्याने स्वत:साठी वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंग्लंडविरुद्ध त्याच्या पहिल्याच कसोटी मालिकेत अक्षरने चेंडूने मारक कामगिरी केली होती. इंग्लंडविरुद्ध मालिकेत मायदेशात त्याने 27 विकेट घेतल्या होत्या. (IND vs NZ 1st Test: कानपुर कसोटीपूर्वी अजिंक्य रहाणे समोर तीन मोठे प्रश्न, लवकरच काढावा लागणार तोडगा)
दरम्यान, किवी संघाविरुद्ध अक्षर पटेलने नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत देखील चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात अक्षरने आपल्या गोलंदाजीने न्यूझीलंड फलंदाजीचा कणा मोडला. त्याने 3 षटकात केवळ 9 धावा देत 3 विकेट घेतल्या. पटेल आपल्या घातक गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही निष्णात आहे. तळाशी फलंदाजीला येत अक्षर मोठी खेळी खेळू शकतो. भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंना मदत करतात. अशा परिस्थितीत हा स्टार फिरकीपटू न्यूझीलंडविरुद्ध घातक गोलंदाजी करून केन विल्यमसनच्या संघावर हल्ला चढवू शकतो.दुसरीकडे नियमित कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या संघात अनुपस्थितीमुळे न्यूझीलंड विरोधात नियमित खेळाडूंसह काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. असेही अनेक खेळाडू आहेत जे भारतासाठी पहिल्यांदाच कसोटीत पदार्पण करू शकतात. यामध्ये विकेटकीपर केएस भरत आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. तसेच प्रसिद्ध कृष्णाचे नावही या यादीत आहे. जयंत यादवला प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले. शुभमन गिलचेही पुन्हा एकदा कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. अशा परिस्थितीत रहाणेची टीम इंडिया कानपुर येथे कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरते याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.