IND vs ENG Test Series: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया (Team India) व ब्रिटिश संघातील कसोटी मालिका म्हटली की सर्वांना उत्सुकता असते ती विराट कोहली (Virat Kohli) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) यांच्यातील लढतीची. नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर हा सामना खेळला जात असून विराट विरुद्ध अँडरसनच्या पहिल्या लढतीत दिग्गज इंग्लंड गोलंदाजाने बाजी मारली आणि भारतीय कर्णधाराला भोपळा फोडू न देता पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. अँडरसन नेहमीच भारतीय फलंदाजांवर भारी पडताना दिसला आहे. नॉटिंगहम (Nottingham) कसोटीच्या पहिल्या डावात अँडरसनने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या स्पेलमध्ये पुजारा व कोहली यांना बाद करत इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने कोहलीला नवव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये आपले शिकार बनवले आहे. (IND vs ENG 1st Test 2021: ‘त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूला बाद करणे...’ कोहलीच्या 'मोठ्या विकेट'वर पाहा काय म्हणाला जेम्स अँडरसन)
भारतीय फलंदाजांविरुद्ध अँडरसनच्या गोलंदाजीकडे पहिले तर त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सर्वाधिक 12 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) नंबर लागतो जो कसोटी क्रिकेटमध्ये 10 वेळा अँडरसनच्या गोलंदाजीचा शिकार झाला आहे. तसेच विराट व माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) संयुक्तपणे तिसर्या स्थानावर आहेत. विराटप्रमाणेच गंभीरला देखील अँडरसनने नऊ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये बाद करण्याचा पराक्रम केला आहे. दरम्यान, विराटची विकेट अँडरसनसाठी ऐतिहासिक ठरली. त्याने चेतेश्वर पुजारापाठोपाठ विराटला बाद करत टीम इंडियाचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या 619 कसोटी विकेट्सची बरोबरी केली. कुंबळेसह आता अँडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत ब्रिटिश खेळाडू एकमेव वेगवान गोलंदाज आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांवर रोखलं. प्रत्युत्तरात भारताने चांगली सुरुवात केली पण दुसऱ्या दिवशी पावसाने खेळात अडथळा आणण्यापूर्वी 112 धावांवर 4 विकेट्स गमावल्या. तसेच तिसऱ्या दिवशी देखील सुरुवातीला पुन्हा पावसाचा खेळ सुरु झाला. ज्याच्यानंतर पहिल्या सत्रात भारतीय संघाने रिषभ पंतची महत्वपूर्ण विकेट गमावली.