भारत-इंग्लंड टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2: अहमदाबाद येथे भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या लंचची घोषणा झाली असून दिवसाच्या पहिल्या सत्रावर इंग्लिश टीमने वर्चस्व गाजवलं आहे. दुपारच्या जेवणाची घोषणा झाली तेव्हा यजमान टीम इंडियाने (Team India) 4 विकेट गमावून 80 धावा केल्या आहेत तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 32 धावा करून खेळत होता. अशाप्रकारे टीम इंडिया पहिल्या डावात इंग्लंडच्या 125 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसाच्या सुरुवातीला जॅक लीच, बेन स्टोक्स आणि जेम्स अँडरसनने संघाला चेतेश्वर पुजारा, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या रूपात मोठी विकेट मिळवून दिली. पुजाराने 17 धावा केल्या तर विराट भोपळा न फोडता माघारी परतला. रहाणेने 27 धावा केल्या. शिवाय, इंग्लंड गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना बांधून ठेवत धावांसाठी संघर्ष करायला लावला. यापूर्वी, पहिल्या दिवशी अँडरसनने शुभमन गिलच्या रूपात संघाला पहिले यश मिळवून दिले होते. अँडरसनने गिलला शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला होता. (IND vs ENG 4th Test 2021: टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, म्हणाले- ‘तीन दिवसांत संपणार चौथी अहमदाबाद टेस्ट’)

टीम इंडियाने 1 विकेट गमावून 24 धावांपासून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. पहिल्या दिवशी शून्यावर पहिली विकेट गमावलेल्या भारतीय संघाला रोहित आणि पुजाराच्या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती मात्र, अँडरसन आणि स्टोक्सच्या वेगवान गोलंदाजीने त्यांना धावांची संघर्ष करावा लावला. या दरम्यान, जॅक लीचने पुजाराची शिकार केली आणि यजमान संघाला डावात दुसरा धक्का दिला. लीचने पुजाराला 17 धावांवर एलबीडब्लयू केलं. चेतेश्वर पुजारानंतर टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली. कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. स्टोक्सने विराटला विकेटच्या मागे बेन फोक्सच्या हाती कॅच आऊट केलं ज्यामुळे टीम इंडियाचा डाव पुन्हा अडखळला. पुजारा आणि विराट झटपट बाद झाल्यानंतर भारताची 41 धावांवर 3 विकेट अशी स्थिती झाली होती ज्यानंतर रोहित-अजिंक्यने भारताचा डाव सावरला. मात्र दुपारच्या जेवणापूर्वी अँडरसनने रहाणेने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

दुसरीकडे, पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लिश टीमचा डाव फक्त 205 धावांवर संपुष्टात आला. स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या तर, डॅन लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. या दोघांना वगळता अन्य इंग्लंड फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. भारताकडून अक्षर पटेलच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. पटेलने 4 विकेट घेतल्या तर आर अश्विनने 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.