IND vs ENG 4th Test 2021: एमएस धोनीची बरोबरी करत Virat Kohli ने रचला इतिहास, भारतीय कर्णधारांच्या एलिट यादीत संयुक्तपणे पटकावले पहिले स्थान
एमएस धोनी आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'विराटसेना' इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या टेस्ट सामन्यात पहिले गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल. आज, 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉससाठी मैदानावर उतरताच ऐतिहासिक कामगिरी केली. विराट कर्णधार म्हणून 60व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी अहमदाबादच्या मैदानावर उतरला आहे. यासह विराटने माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) बरोबरी केली. भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा रेकॉर्ड एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. धोनीने भारतीय कसोटी कर्णधार म्हणून 60 सामने खेळले आहेत तर मोटेरा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना विराटचा कर्णधार म्हणून 60वा सामना आहे. धोनीसह विराटने आता कर्णधारांच्या या एलिट यादीत धोनीसह अव्वल स्थान मिळवले आहे. 2014 मध्ये धोनीच्या टेस्ट निवृत्तीनंतर कोहलीला व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा नेतृत्वाची जबाबदारी मिळाली होती. विशेष म्हणजे इंग्लिश कर्णधार जो रूटसाठी (Joe Root) देखील चौथा कसोटी सामना विशेष आहे. रूटचा कसोटी म्हणून इंग्लंडकडून 50वा सामना आहे. (IND vs ENG 4th Test 2021: जो रूटचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, अहमदाबाद टेस्टसाठी असे आहे दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन)

धोनी आणि विराटच्या कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्वाबद्दल बोलायचे तर 32-वर्षीय कोहली कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने 2019 मध्ये कसोटी कर्णधार म्हणून 28वा विजय मिळवत धोनीचा विक्रम मोडला. धोनीच्या कर्णधारपद असताना टीम इंडियाने 27 कसोटी सामने जिंकले. सध्याच्या आकडेवारीनुसार, विराटच्या नेतृत्वात संघाने 35 सामने जिंकले आहेत तर 14 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून 10 सामने अनिर्णीत राहिले आहेत. या उलट धोनीच्या नेतृत्वात संघाने 27 कसोटी सामने जिंकले आहेत आणि 18 सामने गमावले आहेत तर 15 अनिर्णीत राहिले आहेत. दुसरीकडे, कर्णधार म्हणून सर्वाधिक टेस्ट सामने खेळण्याचा रेकॉर्ड माजी दक्षिण आफ्रिकी फलंदाज ग्रीम स्मिथच्या नावावर आहे ज्यांनी 109 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 ने आघाडीवर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना चौथ्या सामन्यात विजय आवश्यक आहे. शिवाय, त्यांना प्रभाव टाळणेही गरजेचे आहे कारण चौथ्या सामन्यात पराभव झाल्यास ऑस्ट्रेलिया संघासाठी फायनलचे द्वार उघडतील.