IND vs ENG 4th Test 2021: टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, अश्विन 'हा' पराक्रम करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू, तिसऱ्या दिवशी सामन्यात बनले हे प्रमुख रेकॉर्ड
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: भारतीय संघाने (Indian Team) अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवर झालेल्या इंग्लंड (England) संघाविरुद्ध मालिकेच्या चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला आहे. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल करत इंग्लिश संघाला गुडघे टेकण्यास भाग पडले. भारतीय संघाच्या या फिरकी जोडीने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती आणि इंग्लंड दुसऱ्या डावात 135 धावांपर्यंत मजल मारू शकली ज्यामुळे यजमान संघाने घरच्या मैदानावरील आपली घोडदौड सुरु ठेवली. टीम इंडियाने चौथ्या अहमदाबाद टेस्ट सामन्यासह चार सामन्यांची मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तीन दिवसात संपुष्टात आलेल्या सामन्यात काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 4th Test 2021: अक्षर पटेल-अश्विन यांच्या खेळीने इंग्लंड गारद; अहमदाबाद टेस्ट मालिकेत टीम इंडिया 3-1 ने विजयी)

1. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कसोटी मालिकेत दोनदा 30 विकेट घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेत अश्विनची विकेटची संख्या 30 आहे तर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत फिरकी गोलंदाजीने 31 विकेट्स घेतल्या होत्या.

2. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध अक्षर पटेलने पुन्हा 5 विकेट घेत डेब्यू कसोटी मालिकेमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेण्याच्या दिलीप दोशीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. दोषी यांनी 1979 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 विकेट घेतल्या होत्या.

3. अहमदाबाद येथील चौथ्या कसोटी सामन्यातील विजयासह टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 13 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

4. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या घरच्या मैदानावरील हा 10वा कसोटी विजय ठरला.

5. अश्विनने चौथ्या कसोटी सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कर्टली एम्ब्रोस यांना मागे टाकले. एम्ब्रोस यांनी 405 टेस्ट विकेट घेतल्या असून अश्विनच्या नावावर आता 409 कसोटी विकेट्स झाल्या आहेत.

6. दुसऱ्या डावात पाच विकेट्ससह 34 वर्षीय अश्विनने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या कपिल देव आणि बिशन सिंह बेदी यांचा विक्रम मोडला. 85 विकेट्ससह तो आता बी.एस. चंद्रशेखर आणि अनिल कुंबळेनंतर इंग्लंडविरुद्ध भारताचा तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

7. जॉनी बेअरस्टो भारताविरुद्ध सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याऱ्या फलंदाजांमध्ये शेन वॉर्नसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. बेअरस्टोची भारताविरुद्ध 9 डावात शून्यावर बाद होण्याची ही सहावी वेळ ठरली.

8. वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंतमध्ये 113 धावांची भागीदारी झाली होती. 7व्या आणि 8व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करण्याची भारतीय संघासाठी ही तिसरी वेळ ठरली.

9. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा घरच्या मैदानावरील 23वा विजय ठरला. इंग्लंडच्या स्टीव्ह वॉ यांनी मायदेशी कर्णधार म्हणून 22 कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे.

10. पहिला सामना गमावून टीम इंडियाने मालिका जिंकण्याची ही सहावी वेळ ठरली आहे.

दरम्यान, जो रूटच्या इंग्लिश टीमविरुद्ध चौथ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने फक्त मालिकाच खिशात घातली नाही तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट सिरीजच्या अंतिम सामन्यातही धडक मारली. आता जून महिन्यात इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी लढत होईल.