टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: इंग्लंडच्या (England) भारत (India) दौऱ्यावरील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान टीम इंडियाने (Team India) डाव आणि 25 धावांनी रोमांचक विजय मिळवला आणि मालिकेत 3-1ने विजय मिळवला. रिषभ पंतचे (Rishabh Pant) शतक, वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) 96 नाबाद धावा आणि फिरकीपटू अक्षर पटेल-अश्विनच्या ‘पंच’समोर इंग्लंडचा डाव पुन्हा घसरला आणि संघ दुसऱ्या डावात अवघ्या 135 धावांवर ऑलआऊट झाला. संघासाठी दुसऱ्या डावात डॅन लॉरेन्सने सर्वाधिक 50 धावा केल्या तर कर्णधार जो रूटने 30 धावांचे योगदान दिले. भारताकडून फिरकी गोलंदाजांची जादू कायम राहिली. लोकल बॉय पटेल आणि अश्विन यांनी प्रत्येकी 5 विकेट घेतल्या. यापूर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 365 धावांवर आटोपला आणि यजमान संघाने दुसऱ्या डावात 160 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका विजयासह टीम इंडियाने आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात प्रवेश केला आहे. (ICC World Test Championship Final 2021: टीम इंडियाची लॉर्ड्स वारी, ऑस्ट्रेलियाचं स्वप्न चक्काचूर करत मिळालं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट)

अहमदाबाद टेस्टच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने 7 बाद 294 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली आणि पहिल्या सत्रात आणखी 79 धावा जोडल्या. सुंदर आणि पटेलच्या जोडीने आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली मात्र, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अक्षर रनआऊट झाला आणि 43 धावांची खेळी करून माघारी परतला. यानंतर बेन स्टोक्सने इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं व यजमान संघाचा डाव 365 धावांवर संपुष्टात आणला. टीम इंडियाने अखेरच्या तीन विकेट अवघ्या 5 चेंडूत गमावल्या. विशेष म्हणजे या सर्वात सुंदर दुर्देवी ठरला. इतर फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने तो पुन्हा एकदा एकाच मालिकेत शतकापासून वचिंत राहिला आणि नाबाद 96 धावांची खेळी करून परतला. इंग्लंडसाठी स्टोक्सने सर्वाधिक 4 गडी बाद केले तर जेम्स अँडरसनला 3 आणि जॅक लीचला 2 विकेट मिळाल्या.

यापूर्वी, टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणारी इंग्लिश टीम पहिल्या डावात अवघ्या 205 धावाच करू शकली. अक्षर पटेल आणि अश्विनच्या फिरकीपुढे पहिल्या डावातही इंग्लिश संघ असहाय्य दिसले. स्टोक्सने 55 धावा केल्या आणि लॉरेन्सने 46 धावांचे योगदान दिले. शिवाय, पटेलने पहिल्या डावात 4 विकेट घेतल्या आणि अश्विनने 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. सिराजला 2 आणि सुंदरला 1 विकेट मिळाली.