ICC World Test Championship Final 2021: टीम इंडियाची लॉर्ड्स वारी, ऑस्ट्रेलियाचं स्वप्न चक्काचूर करत मिळालं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

ICC World Test Championship Final 2021: अहमदाबाद टेस्ट (Ahmedabad Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंडचा (England) डाव आणि 25 धावांनी धुव्वा उडवला आणि मालिकेत 3-1 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला. चेन्नई येथे झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजयी सुरुवात केली, मात्र अखेरच्या तीन सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व कायम ठेवत तीनही सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. यासह, टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं (World Test Championship) स्वप्न चक्काचूर करत फायनलचं तिकीट निश्चित केलं. न्यूझीलंड (New Zealand) संघाने या आयसीसी (ICC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेश केला असून भारतीय संघाने देखील या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. इंग्लंडमधील क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स (Lords) स्टेडियमवर न्यूझीलंड आणि भारत संघात जून महिन्यात अंतिम सामना रंगणार आहे. (IND vs ENG 4th Test 2021: अक्षर पटेल-अश्विनच्या जोरदार ‘पंच’समोर इंग्लंडची घसरगुंडी, अहमदाबाद टेस्टमध्ये डाव व 25 धावांनी मात करत टीम इंडिया मालिकेत 3-1 ने विजयी)

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने 17 कसोटी सामन्यांत 12 विजय नोंदविले, 4 गमावले तर फक्त 1 कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. टीम इंडियाच्या या रेकॉर्डच्या एकही संघ जवळ पोहचू शकलेला नाही. इंग्लंडने 21 कसोटी सामन्यांत 11 विजय मिळवले होते परंतु ते चौथ्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघाने 490 गुणांसह टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच फायनलमध्ये 11 कसोटी सामन्यांत 7 विजय आणि 4 पराभवासह 420 गुणांची कमाई करत पात्रता मिळविली होती.  भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी चुरस रंगली होती. मात्र, अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने इंग्लंडला पराभूत करत इंग्लिश संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते तर ऑस्ट्रेलियाला क्वालिफाय करण्यासाठी इंग्लंडने चौथा आणि अंतिम सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र, आता इंग्लंडच्या पराभवामुळे कांगारू संघाचे कसोटी अजिंक्यपद जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आणि भारतीय संघ आता लॉर्ड्ससाठी इंग्लंडचा प्रवास करण्यास सज्ज झाला आहे.

चौथ्या अहमदाबाद कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 205 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाचा पहिला दावा 365 धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना 160 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही इंग्लंड फलंदाजांची घसरगुंडी सुरूच राहिली आणि संपूर्ण संघ 135 धावांवर ऑलआऊट झाला, ज्यामुळे टीम इंडियाने इंडियाचा 25 धावा आणि डावाने विजय मिळवला आणि मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे.