IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) येथील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने कर्णधार जो रूटचे (Joe Root) धमाकेदार शतक तसेच रोरी बर्न्स, हसीब हमीद आणि डेविड मलानच्या (Dawid Malan) अर्धशतकी खेळीच्या जोरावर 8 विकेट्स गमावून 129 ओव्हरमध्ये 423 धावसंख्येचा आकडा गाठला आणि भारतावर 345 धावांची मोठी आघाडी घेतली. रूटने सलग तिसऱ्या सामन्यात शंभरी धावसंख्येचा टप्पा गाठला आणि 165 चेंडूत सर्वाधिक 121 धावा चोपल्या. तसेच मलानने 70 धावा, हमीदने 68 आणि बर्न्सने 61 धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांनी विकेट्स घेत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं मात्र दुसऱ्या दिवसावर ब्रिटिशांनी वर्चस्व गाजवले. भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) व रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली. (IND vs ENG 3rd Test: हसीब हमीदचा अडथळा दूर करत रवींद्र जडेजाने केली कमाल, भारतीय फिरकीपटूने 41 विकेट्सनंतर केले यश संपादन)
120 धावांपासून पुढे दुसऱ्या दिवसाच्या खेळास सुरुवात करत इंग्लंडने दुसऱ्या सत्रापर्यंत 200 धावांपर्यंत मजल मारली. दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यावर रूट आणि मलान यांनी धावफलक हालता ठेवला. सलामी जोडीच्या विकेटनंतर इंग्लंडचा कर्णधार रूटने संघाचा धावफलक पुढे नेण्याची धुरा सांभाळली. आधी मलान आणि नंतर जॉनी बेयरस्टोसह अप्रतिम शतकी भागिदारी करत 104व्या ओव्हरपर्यंत त्याने शतकाला गवसणी घातली. रूटचे कसोटी कारकिर्दीतील हे 23वे शतक ठरले. इशांत शर्माच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूंवर खणखणीत चौकार खेचत त्याने 124 चेंडूंचा सामना करत शतकी पल्ला गाठला. रूटचे यंदाच्या वर्षातील हे सहावे तर या कसोटी मालिकेतील सलग तिसरे शतक आहे. यापूर्वी त्याने नॉटिंगहम कसोटीच्या दुसऱ्या डावात आणि नंतर लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात 180 नाबाद धावांची शतकी कामगिरी केली होती. पण चहापानाच्या ब्रेकपर्यंत सिराजने मलानच्या खेळीवर अंकुश लावला आणि इंग्लिश फलंदाज 128 चेंडूत 11 चौकारांसह 70 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रूटने पुन्हा बेअरस्टोला साथीला घेत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली.
रूट-बेअरस्टोची अर्धशतकी भागीदारी झाली असताना शमीने पहिल्या स्लिपमध्ये 29 धावांवर बेअरस्टोला विराट कोहलीकडे झेलबाद केले. त्यांनतर शमीने इंग्लंडला आणखी एक झटका देत जॉस बटलरला इशांत शर्माकडे कॅच आऊट केले. बटलरने 7 धावा केल्या. त्यांनतर जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला मोठे दिलासा दिला आणि चौफेर फटकेबाजी करणाऱ्या जो रुटचा त्रिफळा उडवला. रूट पाठोपाठ मोईन अली जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलकडे (सब्स्टिट्युट) झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. सिराजने 30 चेंडूत 15 धावांवर सॅम कुरनला माघारी धाडलं.