IND vs ENG 3rd Test: हसीब हमीदचा अडथळा दूर करत रवींद्र जडेजाने केली कमाल, भारतीय फिरकीपटूने 41 विकेट्सनंतर केले यश संपादन
रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपली स्थिती बरीच मजबूत केली आहे. पहिल्या दिवशी भारताला फक्त 78 धावांवर गुंडाळल्यातर ब्रिटिश संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 120 धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी हसीब हमीद (Haseeb Hameed) आणि रोरी बर्न्स या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके केली. तर भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करताना दिसले. पण दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात हे चित्र बदलले. दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लिश संघाला भारतीय गोलंदाजांनी दोन धक्के दिले. रोरी बर्न्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवून मोहम्मद शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यांनतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) हसीब हमीदचा त्रिफळा उडवला आणि इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. जडेजाने या विकेटच्या बळावर यंदाच्या मालिकेत एक अनोखा पराक्रम नोंदवला आहे. (IND vs ENG 3rd Test: भारत-इंग्लंड यांच्यात हेडिंग्लेवर कोण फडकावणार विजयाचा झेंडा? माजी इंग्लिश कर्णधाराने केली मोठी भविष्यवाणी)

इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या मालिकेत भारतीय फिरकीपटूने पहिली विकेट घेतली आहे. सध्याच्या मालिकेत विरोधी संघाचे 41 विकेट्स पडल्यानंतर कोणत्याही भारतीय फिरकीपटूला पहिली विकेट मिळाली आहे. भारतीय फिरकीपटूला पहिली विकेट घेण्यासाठी पहिल्यांदा इतकी प्रतीक्षा करावी लागली आहे. दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड संघाने दुपारच्या जेवणानंतर लेख लिहीपर्यंत 2 गडी गमावून 269 धावा केल्या होत्या. डेविड मलानने 56 धावा केल्या आणि कर्णधार जो रूट 62 धावा करून क्रीजवर खेळत आहेत. तत्पूर्वी, रोरी बर्न्सने 61 आणि हसीब हमीदने 68 धावा केल्या. इंग्लंड भारताच्या पहिल्या डावापेक्षा 188 धावांनी पुढे आहे. भारतासाठी तिसऱ्या कसोटीची सुरुवातच खराब झाली आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. पण पाहता पाहता भारतीय फलंदाज तंबूत परतू लागले आणि अवघ्या 78 धावांवर माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर गोलंदाजांप्रमाणे फलंदाजांनी भारतीय संघाला विकेट्ससाठी संघर्ष करायला लावला.

भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर इंग्लंडकडून वेगवान गोलंदाजांनी मैदान मारलं. इंग्लिश संघासाठी जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.