IND vs ENG 3rd Test: भारत-इंग्लंड यांच्यात हेडिंग्लेवर कोण फडकावणार विजयाचा झेंडा? माजी इंग्लिश कर्णधाराने केली मोठी भविष्यवाणी
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. लॉर्ड्समध्ये पराभव झाल्यानंतर इंग्लंड संघाने हेडिंग्ले (Headingley) येथे जोरदार पुनरागमन केले आणि स्टार फलंदाजांनी सजलेल्या भारतीय संघाला फक्त 78 धावांवर गुंडाळत ब्रिटिश संघाने दुसऱ्या दिवशी विकेट गमावून 150 पेक्षा जास्त धावा केल्या. संघाच्या दमदार कामगिरीने प्रभावित होऊन माजी फलंदाज केविन पीटरसनने (Kevin Pietersen) तिसऱ्या कसोटीच्या निकालाचा अंदाज वर्तवला आहे. टीम इंडिया (Team India) सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. नॉटिंगहम येथील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. अशास्थितीत यजमान इंग्लंडवर आता मालिकेत कमबॅक करून भारतासोबत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. (IND vs ENG 3rd Test Day 2: इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी, Lunch पर्यंत केल्या 182 धावा; भारताविरुद्ध पहिल्या डावात इतक्या धावांची आघाडी)

पीटरसनच्या म्हणण्यानुसार, कसोटीच्या शेवटच्या दिवशी खेळपट्टीवर बरेच वळण येईल आणि इंग्लिश फलंदाज मोईन अली याचा फायदा घेऊन भारतीय फलंदाजी क्रमवार हल्लाबोल करेल. पीटरसनच्या मते, इंग्लंड तिसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधेल. पीटरसनने आपल्या ट्विटरवर लिहिले, “मोईन अली रविवारी 6 विकेट घेईल. मालिका 1-1 ने बरोबरीत होईल.” मैदानावरील खेळपट्टीने फिरकीपटूंना सहाय्य करण्याची प्रवृत्ती दर्शवली आहे, त्यामुळे कदाचित पीटरसनने दुसऱ्या डावात प्रभावी गोलंदाजांची निवड म्हणून मोईनला पाठिंबा दिला. अलीला पहिल्या डावात फार चेंडूने काही खास प्रभाव पाडण्यास मिळाले नाही. त्याने फक्त दोन ओव्हर गोलंदाजी केली.

लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. जेम्स अँडरसनच्या नेतृत्वातील इंग्लिश वेगवान आक्रमणाने टीम इंडियाच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर सॅम कुरान आणि ऑली रॉबिन्सन यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत पूर्णपणे चुकीचा ठरला. इंग्लिश गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर भारताचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही आणि अवघ्या 78 धावांवर संपूर्ण संघ माघारी परतला.