
IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) खेळल्या जाणार्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तिसर्या सामन्यात भारतीय संघ (Indian Team) बुधवारी मैदानात उत्तरेल. पहिला सामना इंग्लंडने जिंकला, तर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली. तिसरा सामना अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर (Sardar Patel Stadium) खेळला जाणार असून या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेत आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियासाठी (Team India) आगामी दोन्ही सामने जिंकणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे, मालिकेतील दोन्ही सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळले जाणार आहेत. या सामन्यात भारताला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची असेल. (IND vs ENG 3rd Test 2021: भारत की इंग्लंड, D/N कसोटी सामन्यात कोणाचे पारडे जड? पहा दोन्ही संघाची पिंक-बॉल टेस्टचे आकडे)
चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मधल्या फळीत खेळताना दिसतील. सुरुवातीच्या विकेटच्या धक्क्यापासून संघाला सावरत मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी या तिघांवर असेल. ऑस्ट्रेलिया मालिकेतून फॉर्ममध्ये परतलेला रिषभ पंतनेही इंग्लंडविरुद्ध चांगला खेळ करत आहे. या मालिकेत त्याने विकेटच्या मागेही बऱ्यापैकी कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाईल. इंग्लंडविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात विश्रांती घेतलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात कमबॅक करेल. मोहम्मद सिराजच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकतो. अशास्थितीत, इशांत शर्मा आणि बुमराह तिसर्या कसोटी सामन्यात खेळताना दिसतील. दुसरीकडे, या सामन्यासाठी कुलदीप यादवच्या जागी बुमराहचा समावेश केला जाऊ शकतो, तर सिराजच्या जागी उमेश यादव दुखापतीतून पुनरागमन करू शकतो. अक्षर पटेलने आपल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसर्या डावात 5 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले त्यामुळे अहमदाबादमधेही त्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. आर अश्विन आणि अक्षर फिरकीपटू जोडीच्या भूमिकेत दिसू शकते.
पहा पिंक-बॉल टेस्टसाठी भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव आणि अक्षर पटेल.