भारत-इंग्लंड टेस्ट (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 3rd D/N Test 2021: 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या (Ahmedabad) सरदार पटेल स्टेडियमवर (Sardar Patel Stadium) होणाऱ्या पहिल्या दिवस/रात्र पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामन्यात भारत (India) आणि इंग्लंड (England) संघ आमने-सामने येतील. इंग्लंड गुलाबी चेंडूने चौथा सामना खेळेल. कसोटी क्रिकेटच्या नव्या अवतारात इंग्लंडने फक्त एक सामना जिंकला आहे. तर, जो रूटच्या इंग्लिश टीमला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, आतापर्यंत टीम इंडियाचा पिंक-बॉल कसोटीत संमिश्र रेकॉर्ड राहिला आहे. विराटसेनेने आजवर 2 सामने खेळले असून त्यांनी एक सामना जिंकला असून एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. 2019 मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशचा डाव आणि 46 धावांनी पराभव करत भारतीय संघाने दिवस/रात्र कसोटी प्रवासाची विजयी सुरुवात केली. त्यांच्या दुसर्‍या गुलाबी बॉल टेस्टमध्ये, 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाचा 8 विकेटने पराभव झाला. (IND vs ENG 3rd Test 2021: मोटेरामध्ये टीम इंडियाचा मार्ग खडतर, सामन्यापूर्वी पहा James Anderson याची भेदक गोलंदाजी)

इंग्लंडबद्दल बोलायचे तर 2017 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध डाव आणि 209 धावांनी इंग्लिश टीमने धमाकेदार विजय मिळवला होता. पण, शेवटच्या दोन गुलाबी-बॉल कसोटींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 120 तर न्यूझीलंडविरुद्ध डाव आणि 49 धावांनी त्यांना पराभवाचे तोंड पाहायला मिळाले. डे/नाईट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ सर्वात यशस्वी झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण 15 दिवस/रात्र कसोटींपैकी ऑस्ट्रेलियाने अचूक विक्रम नोंदवत त्यांनी घरातील सर्व आठ सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियानंतर पाकिस्तानने सर्वात जास्त चार वेळा डे/नाईट टेस्ट खेळली असून त्यांनी फक्त एका सामन्यात विजय मिळावा आहे आणि दोन सामने गमावले आहेत. इंग्लंडशिवाय श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दिवस/रात्र सामन्यात त्यांनी डाव आणि 209 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

भारताविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. दोन्ही संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत कायं राहण्यासाठी आगामी दोन्ही सामने जिंकण्याचे मोठे आव्हान आहे.