जो रूट व विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Live Streaming: गुरुवारपासून लॉर्ड्स (Lords) येथे इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आघाडीच्या खेळाडूंसह इतिहास रचण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. नॉटिंगहम येथे खेळल्या गेलेल्या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे अनिर्णित ठरल्यानंतर ‘विराटसेना’ आणि जो रूटची ब्रिटिश आर्मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चक्रातील पहिला विजय नोंदवण्याच्या निर्धारित असेल. 12 ऑगस्टपासून दुसऱ्या लॉर्ड्स कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक दुपारी 3:00 वाजता होईल. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर Virat Kohli मोडणार शतकांचा दुष्काळ? ‘इतक्या’ वर्षांपासून तिहेरी अंकाला तरसला टीम इंडिया कर्णधार)

क्रिकेटचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या मैदानावर भारताने खेळलेल्या 18 कसोटी सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत. 1986 मध्ये पहिल्या विजयाच्या 28 वर्षानंतर 2014 इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने अखेर लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवला होता. तसेच भारताचे अव्वल फलंदाज कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या या मैदानावरील रेकॉर्डही काही चांगला नाही आहे. भारताच्या अव्वल तीन फलंदाजांपैकी फक्त रहाणेने 2014 मध्ये लॉर्ड्सवर शतकी धावसंख्या पार केली आहे. दुसरीकडे, इंग्लंड चार पराभवानंतर पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारत दौऱ्यावर सलग तीन पराभवानंतर ब्रिटिश संघाला न्यूझीलंडविरुद्ध देखील पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यजमान संघ विजयी ट्रॅकवर परतण्याच्या प्रयत्नात असेल.

इंग्लंड संघ: जो रूट (कॅप्टन), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, रोरी बर्न्स, जोस बटलर (विकेटकीपर), झॅक क्रॉली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्स, डोम सिब्ली आणि मार्क वूड.

भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, रिद्धीमान साहा , उमेश यादव, हनुमा विहारी आणि अभिमन्यू ईश्वरन.